गावात अनोळखी, संशयित दिसल्यास संपर्क करा
मोरगाव, ता. ११ : ‘‘बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे व सुपे पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून गावात व परिसरात दिवसा किंवा रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी व संशयित व्यक्ती फिरताना दिसल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन सुपे ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज कुमार नवसरे व वडगाव निंबाळकर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी केले आहे. पोलिस पाटील, गावातील सोशल मीडिया ग्रुप व ग्राम सुरक्षा दलांच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आले आहे.
चौधरवाडी, लोणी भापकर, लोणी पाटी, तरडोली, बाबुर्डी येथे चोरीचे प्रकार झाले आहेत. नागरिकांनी दिवसा शेतात अथवा बाहेरगावी गेल्यास आपल्या घरातील मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, सर्वांनी सतर्क व सुरक्षित राहावे, तसेच संशयित अनोळखी गावात फिरत असतील तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
नुकतेच लोणी भापकर येथील एका वाड्यात अनोळखी दोन इसम सकाळी ११ च्या सुमारास आले. वाड्यात विविध कामानिमित्ताने गावातील लोकांची ये-जा सुरू होती. या गर्दीचा फायदा घेऊन नमस्कार करत त्यांनी वाड्यात प्रवेश केला. आतील बाजूस असलेल्या देवघरातील चांदीची समई, चांदीचे ताट व करंडा आणि स्टीलच्या डब्यातील मंगळसूत्र घेऊन ते वाड्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या बाजूने बाहेर पडले. यावेळी चांदीची भांडी दरवाज्याच्या बाहेरच टाकून ते पसार झाल्याने काही प्रमाणात नुकसान टळले. वाड्यात काम करणाऱ्या कामगाराच्या निदर्शनास काम करताना ही गोष्ट आली त्यावेळी सर्व पाहणी केल्यानंतर देवघराजवळील मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले.
सोमवारी (ता. ७) बाबुर्डी येथील ढोरे वस्तीवरील एका घरातून भर दिवसा ११ पोती धान्य चोरीला गेले. त्यानंतर मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, बाबुर्डी या परिसरात अनोळखी युवक गावात दिवसा दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना देण्यात आली आहे.
सध्या खरीप हंगामातील शेतकामे वेगाने सुरू असल्यामुळे घराला कुलूप लावून जाण्याशिवाय शेतकरी व मजूर वर्गाकडे दुसरा पर्याय नाही. काही ठिकाणी केवळ घरी महिलाच असल्यामुळे लोकवस्ती कमी असलेल्या ठिकाणी व शेतातील घरांमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये या प्रकारांमुळे असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.