बाजार ओटे वापराअभावी धूळ खात
मोरगाव, ता. २४ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उपलब्ध झालेल्या निधीतून २००९-१० यावर्षी बाजारओट्यांचे काम झाले होते. वापराअभावी धूळ खात पडून असलेल्या बाजारओट्यांवर सध्या मोरगावचा आठवडे बाजार तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे.
वास्तविक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अपनी मंडी या उपक्रमातून येथे सुमारे १५ लाख रुपयांच्या निधीमधून बाजारओटे बांधण्यात आले. मात्र, काम झालेल्या ठिकाणची जागा ग्रामपंचायतीच्या नावावर नसल्याची वस्तुस्थिती आहे.
गावापासून हे बाजारओटे जास्त अंतरावर असल्यामुळे आणि मोरगाव जेजुरी हमरस्त्यालगत असलेल्या या ठिकाणी नियमित बाजार भरल्यास अपघाताचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामसभेत नागरिकांचा येथे बाजार भरविण्यास विरोध केला.
येथील माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी जिल्हा परिषद यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असून, जागा नावावर नसताना खोटी कागदपत्रे सादर करून ग्रामपंचायतीने येथे काम केल्याशिवाय निधी खर्च होऊ नये. त्या कामाचा कोणताच फायदा मोरगावकरांना नाही, त्यामुळे या निधीची वसुली करावी, अशी ढोले यांची मागणी आहे.
सध्या कऱ्हानदीकाठी असलेल्या जुन्या बाजारतळावर सुशोभीकरणाचे आणि आवश्यक पायाभूत सुविधांचे काम सुरू असल्यामुळे ग्रामपंचायतीने तात्पुरती सफाई करून शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या बाजारओट्यांवर बाजार सोमवारी (ता. २१) भरवला होता.
मात्र, येथे बाजार भरवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एकीकडे व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारची शिस्त न पाळता कुठेही कशीही दुकाने थाटली होती. दुसरीकडे बाजारात आलेल्या नागरिकांनी जागा मिळेल तिथे कुठेही चारचाकी वाहने, दुचाकी लावल्यामुळे संपूर्ण वातावरण गोंधळाचे झाले होते.
बाजारतळाचे काम होईपर्यंत किमान दोन महिने बाजार याच ठिकाणी बाजारओट्यांवर भरविला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी दीपक बोरावके यांनी दिली. एकीकडे जुन्या बाजारतळाचे काम सुरू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून बाजारओटे बांधूनही केवळ वापराअभावी पडून असलेले ओटे तात्पुरते वापरात आले आहेत. २०२२ मध्ये हे बाजारओटे वापरात का नाहीत, जागा नावावर नसताना हे काम इथे कसे झाले, याबरोबर संपूर्ण चौकशी करून येथील बाजारओटे व त्यांचे व्यवस्थापन याची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना बारामतीचे गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या. मात्र अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. किमान येथे बाजार जोपर्यंत भरत आहे, तोपर्यंत मोरगाव ग्रामपंचायतीने या नवीन ठिकाणी किमान तात्पुरत्या सोयीसुविधा, कर्मचाऱ्यांकडून विक्री केंद्रांचे व पार्किंगचे व्यवस्थापन करावे, अशी येथे येणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.
वापराअभावी कट्टे मोडकळीस
वास्तविक महिला सक्षमीकरण, महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यासाठी विक्री केंद्र, आठवडे बाजार यासाठी बाजारओटे, महिला बचत गटांना व्यासपीठ असा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा निधी उपलब्ध करून देताना उद्देश होता. मात्र येथे केलेले काम त्याचा उपयोग आत्तापर्यंत कोणालाच न झाल्यामुळे वापराअभावी हे कट्टे मोडकळीस आले असून, निधी पाण्यात गेल्याची परिस्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.