मोरगावमधून पितळ, तांब्याच्या भांड्यांची चोरी

मोरगावमधून पितळ, तांब्याच्या भांड्यांची चोरी

Published on

मोरगाव, ता. ७ : येथील मुख्य पेठेतून बंद घराचे कुलूप तोडून त्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या पितळ व तांब्याच्या भांड्यांची चोरी झाली.
मोरगाव (ता. बारामती) येथील दत्तात्रेय रामभाऊ तावरे यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तावरे यांचे जुने घर मुख्य पेठेत असून ते गेले काही वर्षांपासून मोरगाव जेजुरी रस्त्यालगत नवीन बांधलेल्या घरामध्ये राहतात. दसरा सण होण्यापूर्वी त्यांनी हे भांड्यांचे जुने घर कामानिमित्ताने उघडले होते. त्यावेळी सर्व भांडी होती मात्र, मंगळवारी ३० सप्टेंबरला येथील भांडी घराचे कुलूप तोडून चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोठी पातेली, घंगाळे, पितळी पिंप, डबे, पराती, बादली, हंडे, पारंपरिक जुना पानाचा डबा, चरवी असे जवळपास ७० ते ८० किलो वजनाची भांडी चोरीला गेली असल्याची माहिती तावरे यांनी दिली. वास्तविक, मोरगाव गावठाण मध्ये कामानिमित्ताने शहरात व इतर ठिकाणी राहणाऱ्या अनेक नागरिकांची जुनी घरे वसलेली आहेत. या घरांमध्ये पारंपरिक मौल्यवान वस्तू व भांडी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संवर्धन करून ठेवलेली आहेत. त्यामुळे भांड्यांची चोरी झालेल्या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुपाचे पोलिस हवालदार राहुल भाग्यवंत यांनी या प्रकाराची संपूर्ण माहिती घेऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील बारीक-सारीक गोष्टींची व घटनांची माहिती घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com