विद्युत साहित्याच्या दुरुस्तीची मोरगाव परिसरातून मागणी
मोरगाव, ता. ७ : ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा सर्वाधिक संबंध दैनंदिन कामकाज करताना विजेशी येतो. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने वीजवाहक तारा, रोहित्र, फ्यूज पेटी, फ्यूज, उघड्यावर असलेले विद्युत जोड अशा धोकादायक असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक दुरुस्ती व देखभाल सातत्य व नियमितपणे करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
गेली काही दिवसात विजेच्या धक्क्यामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरडोली अंतर्गत मासाळ वस्ती येथे विद्युत वाहक तार जोडताना तात्याबा संपत मासाळ या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच, मासाळवाडी ठोंबरे वस्ती दरम्यान बैलपोळा तोंडावर असताना मल्हारी भाऊ मासाळ शेतात बैले घेऊन जाताना जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहक तारेवर पाय पडून दोन बैलांचा जागेवरच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखल्यामुळे बैल गाडी चालविणाऱ्या शेतकऱ्यास कोणती इजा झाली नाही. मात्र, ऐन बैलपोळ्याचा सण व रब्बी हंगामाच्या तोंडावर बळीराजाची सर्जा- राजाची सुमारे एक लाख रुपये किमतीची बैल जोडी विजेच्या झटक्याने हिरावून घेतली.
यापूर्वी मोरगावमध्ये ही सुरेश खंडू पालवे व गणेश रमेश केदारी यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत वितरण कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या विजेवर नियमानुसार वीजबिल आकारले जाते. मात्र, विद्युत पुरवठा होत असलेल्या ठिकाणी देखभाल व आवश्यक ठिकाणी दुरुस्ती यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.