‘वसुली एकपट अन् खर्च तिप्पट’

‘वसुली एकपट अन् खर्च तिप्पट’

Published on

मोरगाव, ता. ८ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेली मोरगाव प्रादेशिक योजनेची दर महिन्याची पाणीपट्टी वसुली ही एकपट तर योजना चालविण्यासाठी येणारा खर्च तिप्पट अशी परिस्थिती असून योजना अडचणीत आली आहे. योजना चालविण्यासाठी सर्वात जास्त खर्च वीजेवर होत आहे. ही योजना दीर्घकाळ व परवडेल अशा परिस्थितीत चालविण्यासाठी सौरऊर्जेचा (सोलर) वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने याठिकाणी सोलर यंत्रणा बसवावी, अशी मागणी तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामपंचायतींनी केली आहे. या मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
सोलरसाठी असणारी सरकारी योजना किंवा सीएसआर निधीतून या योजनेसाठी विद्युत निर्मिती करणारी यंत्रणा बसविण्याची गरज आहे. सध्या मोरगाव प्रादेशिक योजनेमधून मोरगाव, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, तरडोली, लोणी पाटी, बाबुर्डी, शेरेवाडी, माळवाडी लोणी, काऱ्हाटी, जळगाव कप, कऱ्हावागज, अंजनगाव अशा बारा गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेशिवाय या गावांना पाण्याची दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. नाझरे ते अंजनगावपर्यंत या योजनेची ७२ किलोमीटर पाईपलाईन आहे. या योजनेचे पाणी वापरण्यासाठी दरमहा तीन ते साडेतीन लाख रुपये वीज बिलाचा खर्च येतो.
वास्तविक, ज्या गावांना पाणीपुरवठा होतो त्या गावांमधून खूप प्रयत्न करून दीड ते दोन लाखांपर्यंत पाणीपट्टी वसूल होते. मात्र, योजना चालवण्यासाठी विजेवर होणारा खर्च, देखभाल दुरुस्ती, नाझरे पाटबंधारे विभागाला भरावी लागणारी पाणीपट्टी असा दरमहा सात लाख पन्नास हजार रुपये खर्च येतो. अशा प्रकारे या योजनेची थकबाकी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच सोलरची मागणी होत आहे.
सोलर यंत्रणा बसविण्यासाठी मोरगाव प्रादेशिक योजनेच्या व्यवस्थापनाची एक ते दीड एकर पर्यंत जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या ठिकाणी ‘वसुली कमी आणि खर्च जास्त’ या कैचीत सापडलेल्या योजनेस सोलरची जोड देऊन संजीवनी द्यावी, अशी मागणी येथील पाणी वापर करणाऱ्या ग्रामपंचायतींनी केली आहे.

नियमित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन...
मोरगाव प्रादेशिक योजना चालविण्यास परवडत नसतानाही बारामतीच्या पश्चिम भागातील गावांची पाण्याची गैरसोय होऊ नये त्यामुळे मोठी तडजोड करून योजना चालविली जात आहे. मात्र, भविष्यकाळात ही योजना दीर्घकाळ टिकण्यासाठी पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींनी नियमित पाणीपट्टी भरावी, असे आवाहन योजनेचे शाखा अभियंता विकास बुरसे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com