प्रसाधनगृहाला खोडसाळपणाचे ग्रहण
मोरगाव, ता. ९ : मोरगाव (ता. बारामती) येथील बस स्थानकाच्या आवारात स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून प्रसाधनगृहाचे काम झाले आहे. ही सुविधा होऊन अद्याप दोन महिने ही पूर्ण झाले नाहीत, मात्र दरवाजे तोडणे, वॉश बेसिंग फोडणे, नळ चोरणे अशा खोडसाळपणाचे ग्रहण लागल्यामुळे हे प्रसाधनगृह सध्या बंद अवस्थेत आहे.
गेली अनेक वर्षांपासून येथे प्रसाधनगृह नव्हते. तात्पुरत्या पत्र्याच्या केलेल्या शेडची ही दुरवस्था झाल्यामुळे येथे प्रवाशांची नाहक गैरसोय होत होती. त्यामुळे येथील परिसरात स्वच्छतेअभावी व प्रसाधनगृहाअभावी दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रवाशांच्या व येथील स्थानिक नागरिकांच्या सातत्याच्या मागणीमुळे मोरगाव ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यातून येथे प्रसाधनगृहाचे काम झाले. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून याप्रसाधनगृहासाठी सहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. येथील काम पूर्ण करण्यासाठी मोरगाव ग्रामपंचायतीने ग्रामनिधीचाही वापर केला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मोरगाव ग्रामपंचायतीकडून एसटी महामंडळाकडे ते हस्तांतर करण्यात आले. दोन महिन्यापासून या प्रसाधनगृहाचा वापर येथे येणारे भाविक, प्रवासी करत आहेत. मात्र, प्रसाधनगृहाच्या महिला व पुरुष या दोन्ही बाजूच्या युनिटचे दरवाजे तोडणे, नळ तोडणे, वॉश बेसिन फोडणे असे प्रकार अज्ञात व्यक्तीकडून होत आहेत.
एसटी महामंडळाकडून असे प्रकार झाल्यानंतर दोन ते तीन वेळा डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, अज्ञात व्यक्ती दरवाजे तोडण्याचे व इतर नुकसान सातत्याने करत असल्यामुळे सध्या एसटी महामंडळाने हे प्रसाधनगृह बंद ठेवले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नसल्याची परिस्थिती आहे.
एसटी महामंडळाने बस स्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, बस स्थानकातील हिरकणी कक्ष व उपाहारगृह सुरू करावे, अशीही प्रवाशांची मागणी आहे. तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविकांची सतत वर्दळ असते. विविध सवलतींमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जास्त आहे.
अज्ञातांकडून नुकसान
कोणतेही विकास काम किंवा सुविधा यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मोरगाव ग्रामपंचायतीच्या सक्रिय सहभागामुळे या ठिकाणी प्रसाधनगृह उपलब्ध झाले. मात्र, या प्रसाधनगृहाची संबंधित असलेल्या साधनसामग्रीचे ज्या पद्धतीने अज्ञात व्यक्तीकडून खोडसाळपणाने नुकसान केले जात आहे त्याबद्दल मोरगावचे वाहतूक नियंत्रक सचिन मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात वरिष्ठांना कळविले असून, मोरगाव ग्रामपंचायतीकडून येथील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
03266
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.