गॅस टंचाईमुळे खाद्यपदार्थांच्या दरांना तडका

गॅस टंचाईमुळे खाद्यपदार्थांच्या दरांना तडका
Published on

मोरगाव, ता. १ : बारामती तालुक्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस टंचाईमुळे खाद्यपदार्थांचे दर वाढले असून, ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.
तालुक्यातील मोरगाव, सुपे, सोमेश्वरनगर, माळेगाव, पणदरे या भागांत गेल्या काही दिवसांपासून गॅसचा तुटवडा जाणवत आहे. वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेलमधील कामे उशिरा सुरू होत आहेत. व्यवसाय टिकवण्यासाठी अनेक चालक स्थानिक परिसरातून लाकडे गोळा करून चूल किंवा भट्टीचा वापर करत आहेत. यामुळे इंधनाचा खर्च वाढण्यासोबतच पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी चूल वापरणे शक्य नाही, अशा व्यावसायिकांची मोठी गुंतवणूक धोक्यात आली आहे. वितरण व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे ही टंचाई निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक संघटनेने केली आहे.

गेल्या ४० वर्षांपासून आम्ही व्यवसायात आहोत, मात्र सध्या गॅसच्या समस्येमुळे मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा.
- नीलेश शिंदे, मालक, हॉटेल गणेश भुवन

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com