बिबट्याच्या हल्ल्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात
बिबट्याच्या हल्ल्यात

बिबट्याच्या हल्ल्यात

sakal_logo
By

चार ऊसतोड कामगार
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

महाळुंगे पडवळ, ता. १८ : आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील जातेखानवस्ती परिसरात मोटार सायकलवरील तीन ऊसतोड कामगार व एक तीन वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

कळंब येथून ऊसतोड संपवून छाया आत्माराम राठोड (वय ३२), मुक्ताबाई प्रवीण जाधव (वय २८), गुरू आत्माराम राठोड (वय ३) ,आत्माराम नारायण राठोड (वय ३७) हे मोटर सायकलवरून चांडोली बुद्रुक गावाकडे येत होते. धरणमळा व जातेखानवस्तीनजीक अचानकपणे बिबट्याने मोटारसायकलवर हल्ला केल्याने ते जखमी झाले.

कैलास मावकर व नागरिकांनी त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हाताला- पायाला बिबट्याने जखमा केल्या आहेत. दरम्यान, वन अधिकारी प्रदीप औटी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे, तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयातील जखमींची विचारपूस केली आहे.

कळंब ते चांडोली बुद्रुक हा रस्ता बिबट्याच्या हल्ल्याचा केंद्रबिंदू ठरत आहे. चांडोली बुद्रुक, लौकी व कळंब परिसरात बिबट्याने हल्लासत्र सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच्या वातावरण पसरले आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी उपसरपंच संदीप थोरात व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात पाटील यांनी केले आहे.