ओळखपत्र असूनही मतदार यादीतून नाव गायब

ओळखपत्र असूनही मतदार यादीतून नाव गायब

महाळुंगे पडवळ, ता.१३ : आंबेगाव तालुक्यातील अनेक गावातील काही नागरिकांना मतदान ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्याने निराश होऊन घरी जावे लागले. कळंब येथे तर तब्बल १५० हून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. अर्ज भरूनही अनेक नव मतदारांची नावे मतदार यादीत आली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मजूर आणि तरुणांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे.
कळंब येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील माळीमळा, शिरामळा, सुंभेमळा, रामकरमळा, ठाकरवस्ती, जातेखानवस्ती, न्हायरेमळा, कढणस्थळ, पाटीलवस्ती आदी वस्ती मिळून बूथ क्रमांक ७१ तयार करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांचा हा घरचा बूथ आहे. येथे बुथवर अमित भालेराव, धर्मेद्र भालेराव, सत्यवान थोरात, अभिनव कानडे आदी कार्यकर्ते मतदारांना त्रास होऊ नये म्हणून खोली क्रमांक आणि मतदार अनुक्रमांक लिहून देत होते. येथे ग्रामपंचायत निवडणुकीवेळी एकूण एक हजार ४५० मतदार होते. लोकसभा निवडणुकीवेळी जवळपास ४५ ते ५० नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच या भागातील २५ ते ३० नव मतदारांचे अर्ज भरून देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र ७ ते ८ जणांचीच नावेही यादीत आली. कळंब गावातील अन्य भागात अशीच परिस्थिती आहे.

नको ती कटकट...
चांडोली बुद्रुक, लौकी, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, ठाकरवाडी आदी गावातील बुथवर देखील अशीच परिस्थिती आहे. एका वस्तीवरील नागरिकांची नावे दुसऱ्या बुथवर मिळत असल्याने मतदारांची धाव झाली. तर काही जणांनी नको ती कटकट म्हणून मतदान न करताच घरी जाने पसंत केले. मतदानासाठी आलेल्या मतदारांची नावे नसल्याने गोंधळ उडाला होता. कळंब येथील अनेक मतदारांची नावे इतर गावात गेल्याचे सांगण्यात आले.

गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आले आहे. मतदान ओळखपत्र देखील माझ्याकडे आहे. एक वर्षापूर्वी कळंब येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. परंतु लोकसभा निवडणुकीत माझे नावच मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे मला यावेळी मतदानापासून वंचित रहावे लागले आहे.
-खुर्शीदबी इब्राहीम शेख, कळंब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com