समोर पाहतो तर शेतात बिबट्या
महाळुंगे पडवळ, ता. २० : ‘‘चास (ता. आंबेगाव) येथे शेतातील वेलवर्गीय पिकाला कारव्या लावण्याचे सारंग तोडकर, बाबाजी तोडकर यांच्यासमवेत मी काम करत होतो. त्यावेळी डरकाळी फोडण्याचा आवाज आला. त्यावेळी समोर असलेल्या शेतात पाहतो तर बिबट्या. जवळपास तो २० ते २५ मिनिटे आमच्याकडे रोखून व नंतर हळूहळू दुसऱ्या शेतात गेल्यानंतरही आमच्याकडे पाहत होता. अशाही परिस्थितीत धीराने आम्ही काम आटोपून घरी निघून आलो,’’ अशी शब्दांत शेतकरी यशवंत तोडकर यांनी बिबट्याचा थरार सांगितला.
चास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात शेगरमळा, तोडकरमळा, कडेवाडी, राजेवाडी आदी परिसरात ४ बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कधी शेताच्या बांधावर, कांदा बराखीजवळ, तर कधी रस्त्याच्या कडेला जोडीने बिबट्याचे दर्शन या परिसरातील नागरिकांना होत आहे. तोडकरमळ्याचा पूर्वेकडील ओढा, गोसावी बाबा मंदिर रस्त्याने बिबट्या पश्चिमेकडे जातो. हा त्याचा नित्यनियम असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिवाजी बारवेकर यांच्या कांदा बराखीजवळ दोन बिबटे बसले होते. दिलीप तोडकर, मंदा तोडकर, राजश्री तोडकर, सुरेखा तोडकर यांनी ते पहिले. भरदिवसा दोन दिवसांपूर्वी चास- घोडेगाव रस्त्यालगत पिराच्या मंदिराजवळ दोन बिबटे बसले होते. दिवसाही बिबट्यांच्या डरकाळ्याचा आवाज येत असल्याने ज्येष्ठ नागरिक व मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तोडकरमळा येथे शुक्रवारी (ता. २०) सकाळी ९ वाजता हरीओम तोडकर यांच्या बंगल्याशेजारी, उत्तम शेगर व कचर तोडकर यांच्या शेतात जाताना तुकाराम बारवेकर यांच्यासह अनेकांनी बिबट्याला पहिला. याच वस्तीवर शुक्रवारी पहाटे धनगराची शेळी बिबट्याने ठार केली आहे. तसेच, कचर तोडकर, हरीओम तोडकर, यशवंत तोडकर यांची पाळीव कुत्रेही बिबट्याने काही दिवसांपूर्वी फस्त केली. शेगरमळ्यात निवृत्ती नारायण शेगर यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यात एक शेळी ठार झाली असून, एक जखमी आहे. तर, राजेवाडी- कडेवाडी येथील बिपिन नवनाथ चासकर यांचे वासरू उसाच्या शेतात नेले आहे. याबाबत वनअधिकारी सोनल भालेराव, सुशांत चासकर व बी. एस. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
‘शेतात जाणे अवघड’
चास पंचक्रोशीत ४ बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांचा दिवसा नागरी वस्तीवरील शेतात मुक्त संचार आहे. विहिरीवरील मोटार सुरु करण्यासाठी जाताना भीती वाटत असून, शेतात ये-जा करणे अवघड झाले आहे. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थीही ये- जा करताना घाबरत आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार ते पाच पिंजरे लावावेत, अशी मागणी चास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बन्सी शेगर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.