साकोरे येथे बिबट्याचे दर्शन
महाळुंगे पडवळ, ता. १९ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, नांदूर, विठ्ठलवाडी आदी दहा गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. साकोरे येथे भर दुपारीही बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे मजूरही शेतीच्या कामावर येण्यास टाळाटाळ करत आहे.
नांदूर (ता. आंबेगाव) येथील गावठाण वस्तीत दिलीप मारुती भालेराव यांच्या सहा महिन्याच्या कालवड बिबट्याने हल्ला करून ठार केली आहे. यात त्यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनपाल सोनल भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी उपसरपंच शेखर चिखले, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा भालेराव आदी उपस्थित होते. येथे गेल्या आठ ते दहा दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे गरजेचे आहे. साकोरे-गाडेपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. त्यातच शेंद्री ओढ्याच्या परिसरात भरपूर पाणी आहे. पाणकणीस गवताच्या आड बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी येत असल्याने येथे अनेकदा पाहिल्याचे मेंढपाळ जयवंत गाडे यांनी सांगितले.