वृक्ष तोडीमुळे बिबट मानवीवस्तीकडे
महाळुंगे पडवळ, ता. ८ : ‘‘मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने आणि वणवे लावल्याने जंगले नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे पशू, पक्षी आणि प्राण्यांची संख्या कमी झाली. जंगलातला बिबट मानवी वस्तीच्या आसपास भक्ष्याच्या शोधात भटकू लागला आहे. बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यापासून आपण स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे,’’ असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी व्यक्त केले.
महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा गेनू विद्यालयात वन परिमंडळ कळंब यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह झाला. पुढे बोलताना भोसले म्हणाले की, ‘‘लहान मुलांनी शाळेत जाताना समुहाने जावे. नागरिकांनी घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत. रात्रीच्यावेळी फिरताना काठी आणि बॉटरी सोबत असावी. बिबट्या दिसल्यास खाली वाकू नये. त्याचा पाठलाग करू नये. एका जागी उभे राहून आरडाओरडा करावा. शेतात काम करताना गळ्याचे संरक्षण होण्यासाठी मफलर, स्कार्फ बांधावा. रात्री अंगणात झोपू नये आदी सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.’’
वनपाल सोनल भालेराव यांनी विद्यार्थ्यांना बिबटविषयी संरक्षण, वन्यजीव कायदे, मानव आणि वन्यजीव संघर्ष, निसर्ग साखळी, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी वनपाल सोनल भालेराव, सरपंच सुजाता चासकर, प्राचार्य साहेबराव काळे, पर्यवेक्षक अविनाश वाडेकर, वनरक्षक संपत तांदळे, सचिन चासकर, वनसेवक आनंद वळसे, काळूराम गायकवाड, एकनाथ ढोंगे, किसन पोखरकर, जालिंदर थोरात, रेस्क्यू टीम मेंबर, बिबट शीघ्रकृतिदलाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निमोणकर यांनी केले, तर संजय पडघणकर यांनी आभार मानले.