
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार ः नारंग
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
सर्वतोपरी मदत करणार ः नारंग
माळशिरस, ता. ९ : ‘शालेय विकासासाठी ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य मिळाल्यास नायगाव व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल,’ असे प्रतिपादन विलू पुनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग यांनी केले.
नायगाव येथे पुनावाला यांच्या आर्थिक सहभागातून श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जागेत व परिसरातील अनेक गावातील मुलांना उपयोगी असणारी सर्व सुविधापूर्ण १२,००० स्क्वेअर फूट शाळेच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी नारंग बोलत होते.
शाळेसाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असून, आरटीआय संस्था हे काम दहा महिन्यांत पुर्ण करणार आहे. पुरंदरमधील अक्षरसुष्टी संस्था संपूर्ण कामात समन्वयक म्हणून काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीमच्या तालावर, स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विद्यालयातील हर्षल खेसे, सोहम खेसे यांनी स्पर्धेत उत्तम यश मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनीष लखोटिया, श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण चोपडा, विश्वस्त बी. बी. कड, डॉ. दशरथ ठवाळ, अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उरसळ, सरपंच बाळासाहेब कड, रोहीत शिंदे, अपर्णा भावे, विजय कोल्हटकर, मनोज भन्साळी, राहुल वधवा, तरंग शहा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धनाथ पवार यांनी, तर सूत्रसंचालन आबा वाघमारे यांनी केले.
-----------------------------------
नायगाव (ता. पुरंदर) : पुनावाला यांच्या आर्थिक सहभागातून उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मान्यवर.