पुरंदर तालुक्यात युरिया खताची टंचाई

पुरंदर तालुक्यात युरिया खताची टंचाई

Published on

माळशिरस, ता. १० : सध्या पिकांना अत्यंत आवश्यकता असताना युरिया खताची टंचाईनिर्माण झाली आहे. यामुळे पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. बाजारात युरिया उपलब्ध होत नाही. तसेच दुकानात युरिया मिळालाच तर इतर खते घेण्याचा आग्रह काही ठिकाणी केला जात आहे. यामुळे शेती हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात युरिया उपलब्ध होण्यासाठी कृषी विभाग अलर्ट मोडवर असताना देखील ग्रामीण भागात टंचाईचे चित्र जाणवत आहे. यंदा खरीप हंगामात पावसाला वेळेवर सुरुवात झाल्याने खरिपातील पिके सध्या जोमात आहेत. या पिकांना सध्या सुरू असलेल्या पावसामध्ये नत्र खतांची मात्रा आवश्यक त्या प्रमाणात देण्यासाठी शेतकरी युरिया खतांची मागणी खतविक्रेत्या दुकानदाराकडे करताना ग्रामीण भागात सर्रास दिसत आहे.

सध्या खरिपात बाजरी, मका, मेथी व कोथिंबीर यासारख्या पालेभाज्यांसाठी युरिया खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे व मागणीच्या प्रमाणात बाजारात युरिया खताचा पुरवठा नसल्याने ही परिस्थिती पहावयास मिळत आहे. खरिपात युरियाची मागणी मोठे प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासू नये व शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये याकरता तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग तालुक्यातील खत विक्रेत्यांवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मात्र तरीदेखील प्रत्यक्ष युरिया घेताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


युरियाबरोबर इतर खते घेण्याचा आग्रह
मात्र, मागील दीड महिन्यापासून युरियाचा पुरवठाच न झाल्याने खत विक्रेते देखील हातबल झाले असून, जुन्या असलेल्या साठ्यामधील युरिया नेहमीच्या ग्राहकांना कसा बसा पुरवताना दिसत आहे. युरिया बरोबर इतरही खते दुकानदारांवर लादली जात असल्याने दुकानदारही ही खते शेतकरी वर्गांना युरियाबरोबर घेण्यासाठी आग्रह करत आहेत. यामुळेच शेतकऱ्यांना युरियाबरोबर सुफला सारखी इतर खते ही घ्यावी लागत आहेत.

कृषी अधिकारी सूरज जाधव म्हणाले...
* खरिपसाठी साडेआठशे टन युरिया साठा केला होता.
* यातील ३२७ टन युरिया रिलीज केला आहे.
* लवकरच खतविक्रेत्यांकडे युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल.


मंडल स्तरावर सर्व ठिकाणच्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना खत विक्री होताना शेतकऱ्यांना युरिया दुकानदारांकडून आवर्जून दिला जात नसेल व युरियाबरोबर इतर उत्पादने घेण्यासाठी आग्रह केला जात असेल तर त्यावरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांनी देखील आवश्यकता वाटल्यास आमच्याशी संपर्क साधावा. पुढील काळात देखील युरीयाची कमतरता भासू नये यासाठी साडेचारशे ते पाचशे टन युरियाचा साठा ठेवण्यात आला आहे.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी

31450

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.