विमा उतरविण्याकडे शेतकऱ्यांची पाठ

विमा उतरविण्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Published on

माळशिरस, ता. १७ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शासनाने पीक विम्याबाबत केलेल्या बदलांमुळे विमा भरताना शेतकऱ्यांवर अधिकचा भार पडत आहे. अंतिमत विमा देण्यासाठीच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे सध्या पाठ फिरवली आहे. विमा उतरवण्यास सुरुवात होऊन १५ दिवसांचा कालावधी होऊनही अद्याप जिल्ह्यात फक्त एक हजार ५२८ हेक्टरवरील फक्त तीन हजार २९५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.
मागील दोन वर्षांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात विमा उतरविण्यासाठी फक्त एक रुपया आकारला जात होता, मात्र चालू खरीप हंगामासाठी शासनाने यामध्ये बदल करत विमा करता राज्य व केंद्र शासन यांचा हिस्सा वगळता दोन टक्के व या हंगामातील नगदी पिकाकरता पाच टक्के रक्कम पिकानुसार आकारण्याचे निश्चित करून त्यानुसार एक जुलैपासून विमा उतरविण्याचा कालावधी सुरू केलेला आहे. यास आज १५ दिवस उलटूनही शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याकडे पाठ फिरवली आहे.
या मागील कारणांचा विचार करता शासनाने नवीन योजनेत विम्याकरता हप्ता रक्कमेत केलेली वाढ आहे. तसेच पूर्वी पीक विमा पात्रतेसाठी चार ट्रिगर होते. यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्‍चात नुकसान हे तीन ट्रिगर रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोग या एकाच ट्रिगरवर विम्याची रक्कम दिली जाणार आहे. मागील वर्षाचा अनुभव पाहता पीक कापणी प्रयोगाच्या ट्रिगरवर आधारित विम्यातून शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात लाभ मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविल्याचे जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीवरून दिसत आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त पुरंदरमधील ८३२ व त्यानंतर शिरूरमध्ये ७३८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. उर्वरित सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या ही ५०० च्या आत असून मुळशी, भोर, वेल्हा येथील शेतकऱ्यांचा आकडा तर १० च्या आतमध्येच आहेत.

तालुकानिहाय विमा क्षेत्र व अर्ज (१६ जुलैपर्यंत)
तालुका - क्षेत्र(हेक्टर मध्ये) अर्ज
आंबेगाव - ९०.९२ १८२
बारामती - १४३.४६ ३०७
भोर - १.९५ - ५
दौंड - ४२.९८ - ७८
हवेली - ५.४३ - १३
इंदापूर - २३५.६२ - ४१४
जुन्नर - १०९.५४ - २६५
खेड - १८४.४६ - ४०६
मावळ - २०.०६ - ४७
मुळशी - १.४० - २
पुरंदर - २९५.०३ - ८३२
शिरूर - ३९४.५९ - ७३८
वेल्हा - ३.४४ - ६
एकूण - १५२८.७६ - ३२९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com