नवीन पीक विमा शेतकऱ्यांना रुचेना
दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. २२ : खरीप हंगामामधील पीक विम्याकरिता बिगर कर्जदार शेतकऱ्यांची विमा उतरवण्यास असलेली मुदत संपल्यावर जिल्ह्यातील १५ हजार ९८८ शेतकऱ्यांचे ३२ हजार ५९३ अर्ज प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील १५ हजार ३६६ हेक्टर जमिनीवरील पिके विमा कवचमध्ये आली आहेत. मागील दोन वर्षांमध्ये खरीप हंगामाकरिता विमाधारक व अर्जदार आकडेवारी पाहता चालू हंगामासाठी पीक विमाधारकांचे प्रमाण अंत्यत नगण्य दिसत आहे. त्यामुळे नवीन निकषांमध्ये सुरु केलेली ही योजना शेतकऱ्यांना रुचेना असे दिसत आहे.
एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना नव्याने सुरू केलेल्या पीक विम्याच्या प्रथम निर्धारित अंतिम ३१ जुलैपर्यंत अत्यंत कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला. यामुळे शासनाने बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिली होती. मात्र, त्यानंतर देखील पीक विमा उतरवण्यास शेतकऱ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिलेला दिसत नाही. त्यामुळे १४ आॅगस्टअखेर जिल्ह्यात फक्त ३२ हजार ५९३ अर्जदारांचे अर्ज प्राप्त झाले असून, सर्वाधिक अर्ज पुरंदर तालुक्यात ४८३८ असून, त्या खालोखाल इंदापूरमध्ये ४७६१, शिरूरमध्ये ४४२९ व आंबेगाव तालुक्यात ३४५३ अर्ज आले आहेत. तर सर्वांत कमी हवेली तालुक्यात फक्त १०१ अर्ज आले आहेत. तर, जिल्ह्यात या १५ हजार ३६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचा विमा उतरवला गेला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत सहा टक्केच प्रमाण
मागील वर्षामध्ये खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात तीन लाख एक हजार अर्ज आले होते व एक लाख ५५ हजार २० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेत जमिनीवरील पिकांचा विमा उतरवला होता. याचा विचार करता मागील वर्षाचा तुलनेत यंदा दहा टक्के विमा अर्जदार व क्षेत्राचे प्रमाण आहे. त्यामागील सन २०२३मध्ये हीच विमाधारक शेतकऱ्यांची आकडेवारी सव्वादोन लाख होती. यावरून या वर्षी एक रुपयांतील विमा योजना बंद करून नव्याने सुरु केलेली योजना शेतकऱ्यांना रुचली नसल्याचे सध्या दिसत आहे.
पूर्वी असलेल्या योजनेत शेतकरी हिस्सा मध्ये केलेला बदल
मागील दोन वर्षांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पीक विमा उतरवण्यासाठी फक्त एक रुपया आकारला जात असत, मात्र चालू खरीप हंगामासाठी शासनाने यामध्ये बदल करत पीक विमाकरिता राज्य व केंद्र शासन यांचा हिस्सा वगळता दोन टक्के व या हंगामातील नगदी पिकाकरिता पाच टक्के रक्कम पीकनुसार आकारण्याचे निश्चित करून त्यानुसार एक जुलैपासून विमा उतरवण्याचा कालावधी सुरु केला.
पाठ फिरवण्याची कारणे
१. शासनाने एक रुपयात विमा बंद करून नवीन योजनेत पीक विमाकरता हप्ता रक्कममध्ये केलेली वाढ
२. पूर्वी पीक विमा पात्रतेसाठी चार ट्रिगर होते. यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान हे तीन टिगर रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोग या एकाच ट्रिगर वरती विम्याची रक्कम दिली जाणार आहे. मागील वर्षाचा अनुभव पाहता पीक कापणी प्रयोगाच्या ट्रिगर वरती आधारित अत्यंत कमी प्रमाणात शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विमा न उतरवणे पसंत केल्याचे दिसते आहे.
३. विम्या करता शेतकऱ्यांची फार्मर आयडी बंधनकारक केल्याने अनेक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही.
जिल्ह्यात तालुकानिहाय विमा क्षेत्र व अर्ज
३१ जुलै २०२५चे क्षेत्र व अर्ज। २०२४चे २०२३चे
तालुका। क्षेत्र(हेक्टर मध्ये) अर्ज। अर्ज। अर्ज
आंबेगाव। २१५८ ३४५३ २६१४४ १९८२१
बारामती। १३६८ २९६८ ४४२९२ ३०५१६
भोर। ८० २७६ १७४९ ८२३८
दौंड। २९६ ५१३ १२७१० ५१०३
हवेली। ५४ १०१ १२८५ ३२०७
इंदापूर २८२८ ४७६१ ४२०१२ १३७९८
जुन्नर १६३० ३२३२ ४२८७० ३२०५६
खेड। ८४६ २०२९ ३२६५० २४२२१
मावळ। ९८० २१६९ ९०६० १५८०९
मुळशी। १०८ ३६९ १८४२ ५४८८
पुरंदर १७९० ४८३८ ४१९१९ २२७९०
शिरूर २२५८ ४४२९ ४०९१२ ४००१८
राजगड ९७० ३४४५ ४१०१ ७३५१
एकूण १५३६६ ३२५९३ ३०१००० २२५०००
राजगडमधील कर्जदार शेतकऱ्यांची आघाडी
कर्जदार शेतकऱ्यांमध्ये राजगड तालुक्यातील सर्वाधिक ३४०७ अर्ज आले असून, येथील फक्त ३८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा अर्ज केले आहेत. मावळ तालुक्यात देखील सोळाशे तीन कर्जदारांनी अर्ज केले, तर फक्त ५६६ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. आंबेगाव तालुक्यातदेखील २२८७ कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
हे तीन ट्रिगर कमी करण्यात आली
१. स्थानिक नैसर्गिक आपत्ती
२. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती
३. काढणी पश्चात नुकसान
शासन इतर गोष्टी वर खर्च करताना आखडता हात घेत नाही परंतु पीक विमा करता एक रुपया मधील योजना बंद केली हे चुकीच आहे. भविष्यात शासनाने याचा विचार करून सर्वसामान्य शेतकरी हित विचारात घेऊन योजना निश्चित करावी.
- रामदास वाघले, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.