काढणीस आलेल्या कांद्याच करायचं काय?

काढणीस आलेल्या कांद्याच करायचं काय?

Published on

माळशिरस, ता.९ : पुरंदर तालुक्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगामातील कांद्यावर पिळ रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. त्यातच काढणीस आलेल्या कांद्यास चांगला बाजारभाव मिळत नाही. तो मातीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या कांद्याचे करायचं काय? या यक्षप्रश्‍नाने उत्पादक हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील पूर्व भागामध्ये खरीप हंगामामध्ये कांद्याची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने व मागील वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांनी अधिकची कांदा पेरणी केली होती. पाऊस अधिक असल्याने वखारीतील कांदा लवकर जाऊन पेरणीच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, वखारीतील कांद्यालाच बाजारभाव नसल्याने पेरणी केलेला आगाप कांदा काढायला येऊन देखील त्याला काढून करायचे काय? असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. त्यात वारंवार पाऊस होत असल्याने हा शेतातील काढायला आलेला शेतातील कांदा ओलसरपणामुळे खराब होऊ लागला आहे. यामुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामात मागास केलेल्या कांद्याला सध्या पिळ रोगाचा मोठा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झालेली कांद्याचे शेत पूर्णतः वाया गेले आहे. अनेक औषधांची फवारणी करून देखील असा कांदा पूर्ववत होत नसल्याने कांदा उत्पादक यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

नवीन कांदा पाच ते दहा रुपये किलो
बाजारात नवीन काढणीस आलेला हळवी कांदा पाच रुपये ते दहा रुपये एवढ्या कमी दराने विकला जात असल्याने यातून कांद्याचा मशागतीचा, बी बियाणे, औषध फवारणी याचा खर्च तर लांबच मात्र सद्यःस्थितीमध्ये काढून बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडत नाही.


02652

Marathi News Esakal
www.esakal.com