माळशिरस आरोग्य केंद्राला रिक्तपदांचे ग्रहण

माळशिरस आरोग्य केंद्राला रिक्तपदांचे ग्रहण

Published on

दत्तात्रेय जाधव
माळशिरस, ता.३ : पुरंदर तालुक्यातील माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४३ हजार लोकसंख्येच्या आरोग्य सुविधा देण्याचा भार असताना येथील आरोग्य केंद्रात असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आरोग्य सेवा देण्याचा मोठा ताण पडत आहे. येथे मंजूर असणारे शिपायांची सर्व जागा रिक्त असल्याने शिपायापासूनचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनाच करण्याची वेळ येत आहे.
या आरोग्य केंद्र अंतर्गत ११ उपकेंद्र कार्यरत आहेत; मात्र माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणीच मंजूर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील अनेकपदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांना रुग्णांना आरोग्य सेवा देताना मोठी कसरत करावी लागते. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत नागरिक आरोग्य सुविधा देण्याबाबत समाधानी असले तरी रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पूर्वीच्याच जीर्ण इमारतीत येथील कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहेत. जागेच्या वादात अनेक वर्षे रखडलेली येथील इमारत आता काटेवाडी येथील आरोग्य केंद्राच्या धर्तीवर करण्याबाबत मंजुरी मिळाली असली तरी हे काम सुरू व्हायला किती कालावधी लागेल याबाबत अनिश्चितता आहे.

या जागा रिक्त
मंजूर असणारी शिपायांची सर्वच पदे रिक्त असल्याने त्यांची कामे इतर कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. तीच परिस्थिती परिचर पदाबाबत असून मंजूर चार पदांपैकी एकही जागा भरलेली नाही. इतर मंजूर पदातील १२ पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सेवकांच्या १२ जागा मंजूर असताना फक्त सात कार्यरत असून पाच जागा या रिक्त आहेत तर आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक यांची प्रत्येकी एक जागा रिक्त आहेत. तसेच येथील वाहन चालकाची मंजूर असणारी एक जागा देखील रिक्त आहे.

जनजागृती करण्याचे काम सुरू
आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच गावोगावी महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून यासाठी आवश्यक तेथे पुढील काळात शिबिर घेण्यात येणार असून कर्करोग संदर्भातही जनजागृती करण्याचे काम आरोग्य केंद्राच्या स्तरावरही केले जात आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका साळुंखे व शुभंकर देशमुख यांनी सांगितले.


02677

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com