माळशिरस- सासवड रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था
माळशिरस, ता. २५ : माळशिरस- सासवड रस्त्यावर माळशिरस (ता. पुरंदर) गावालगत असणाऱ्या ओढ्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन खड्ड्यामध्ये वाहनांचा अपघात होऊन बळी जाण्याची वाट पाहत आहे की काय? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
माळशिरस ते सासवड या रस्त्याने या परिसरातील अनेक गावातील नोकरदारवर्ग नियमितपणे सासवड, हडपसर, पुणे परिसरात जातो. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणात असलेल्या या रस्त्याचे आठ वर्षापूर्वी काम केले होते. सध्या मागील पावसापासून माळशिरस गावापासूनच या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. गावालगत असणाऱ्या ओढ्यावरील पुलावर तर कुठला खड्डा चुकवायचा, असा प्रश्न वाहन चालकांना पडत असून, यामध्ये अनेक दुचाकी वाहनचालक खड्डे चुकविताना घसरून पडत आहेत. पंधरा दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला हे खड्डे बुजविण्यासाठी निवेदन देऊन दखल न घेतल्याने १४ नोव्हेंबर रोजी येथील माजी उपसरपंच माऊली यादव, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश यादव यांच्यासह गावातील काही तरुणांनी प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने रस्त्यातील या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून याचा निषेध केला होता. मात्र, तरी देखील प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही असे दिसत आहे.
प्रशासनाने सोमवारी (ता. २४) रात्रीपासून सासवड- माळशिरस या रस्त्यावर सासवड नगरपालिका हद्दीतील आंबोळीच्या ओढ्यापासून सासवडपर्यंतच्या भागात खड्डे बुजविण्याचे काम चालू केले आहे.
सासवड- माळशिरस रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सासवड येथून सुरुवात केली असून, पुढील दोन दिवसातच उर्वरित भागात देखील राहिलेले खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल
- स्वाती दाहिवाल, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे- मोठे अपघात होत आहेत. भुलेश्वर येथे येणाऱ्या भाविकांनाही या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मी स्वतः देखील या खड्ड्यांमुळे गाडी घसरून पडली आहे.
- आरती यादव, सरपंच, माळशिरस
02717
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

