सासवड- माळशिरस रस्त्याची दुरुस्ती ठप्प
माळशिरस, ता. १० ः सासवड- माळशिरस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी २० दिवसांपूर्वी प्रशासनाने सुरुवात केली होती. यामुळे आता हा रस्ता खड्डे मुक्त होईल, अशी नागरिकांना मोठी आशा होती. मात्र, सामान्य नागरिकांची ही आशा फोल ठरली आहे, असे सध्या दिसत आहे. चार दिवस तीन किलोमीटर अंतरातीलच सासवड बाजूने खड्डे बुजवल्यानंतर मागील १५ दिवसांपासून हे खड्डे बुजविण्याचे काम बंद पडलेले आहे. यामुळे तीन किलोमीटरमधील खड्डे बुजविण्यातच प्रशासन गळाटले की काय? असा प्रश्न वाहनचालक व नागरिकांना पडू लागला आहे.
सासवड- माळशिरस- यवत हा रस्ता आठ वर्षांपूर्वी करण्यात आला होता. यामुळे मोठी वर्दळ असणारा हा रस्ता मध्यंतरीच्या पावसानंतर खड्डेमय झाला आहे. महिन्यापूर्वी माळशिरसमधील माऊली यादव व राजेवाडी येथील राजेंद्र शिंदे यांनी प्रशासनाकडे हे खड्डे बुजविण्यासाठी निवेदन देऊन प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही काम सुरू न झाल्याने आठवडाभरानंतर माळशिरस येथे तंटामुक्ती अध्यक्ष गणेश यादव, माऊली यादव यांच्यासह गावातील तरुण कार्यकर्त्यांनी रस्त्यातील या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध केला होता.
सासवड नगरपालिका हद्दीत एक किलोमीटर हा रस्ता येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने सासवड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या अगोदर या रस्त्याच्या खड्डे बुजवण्याला मुहूर्त काढत खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. निवडणुकीपर्यंत सासवड नगरपालिका हद्दीतून खड्डे बुजवून रस्त्यावरील खड्डे कसे बसे अंबोडी गावच्या शिवेपर्यंत बुजविण्यात आले. मात्र, त्यानंतर हे खड्डे बुजविण्याचे काम मागील १५ दिवसांपासून पूर्णता थांबले आहे. नगरपालिका हद्दीत रस्त्यातील खड्डे बुजविताना देखील फक्त मोठे खड्डे बुजविण्यात आले असून अनेक लहान खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत.
मंत्री महोदयांकडे फोन करायचा की काय?
विशेष म्हणजे या कामाबाबत काय परिस्थिती आहे. काम का बंद आहे व केव्हा सुरू होईल, असे विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उप अभियंता स्वाती दाहिवाल यांना अनेकदा फोन करून देखील त्या कोणाचाही फोन घेऊन उत्तर देत नाहीत. उपविभागीय अभियंत्यांचीच अशी स्थिती असताना वरिष्ठ कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी यांना देखील याबाबत माहिती घेण्यासाठी फोन केला असता त्या देखील सामान्य माणसासह बातमीदारांचे देखील फोन उचलण्याचे कष्ट घेत नाहीत. यामुळे आता सामान्य माणसांनी या कामासाठी नक्की संपर्क सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना साधायचा की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी यांना लेखी निवेदन दिल्यानंतर दोनवेळा उप अभियंता स्वाती दाहिवाल यांच्याकडे नागरिकांसह काम करण्यासाठी भेट घेतली. मात्र, अधिकारी याची कुठलीही दखल घेत नाहीत. रस्त्यावरील या खड्ड्यांमध्ये वाहनचालक वारंवार घसरून अपघात होत आहेत. असे असताना हे खड्डे बुजविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने खड्ड्यात पडून कोणाचा बळी जाण्याची प्रशासन वाट पाहते की काय?
- राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, राजेवाडी
02736
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

