माथाडी कामगाराची मुलगी सीए

माथाडी कामगाराची मुलगी सीए

Published on

हिर्डोशी, ता. १० : चिखलगाव (ता. भोर) येथील सुपुत्र व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले माथाडी कामगार संजय बाजीराव धोंडे यांची मुलगी सिद्धी संजय धोंडे हिने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर सीए परीक्षेत यश संपादन करत आपले स्वप्न सत्यात उतरवले.
माथाडी कामगार असलेले सिद्धी हिचे वडील संजय धोंडे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे शिक्षण आंबवडे (ता. भोर) येथे दहावीपर्यंत झाले. परंतु, ते लहान असताना सन १९९२ मध्ये त्यांचे वडिलांचे छत्र हरपले. आई, दोन भाऊ व बहिण असे कुटुंब असलेल्या घरची परिस्थिती हालाखीची होती. संजय यांची आई गोदाबाई यांनी सुरवातीला शिलाई काम करून घर खर्च भागवला. परंतु, यातून उपजीविका भागविणे कठीण जात असल्यामुळे संजय यांनी कामधंद्यातून चार पैशाची मदत होईल, यासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला कापड दुकानात काम केल्यावर चुलत्यांच्या प्रयत्नातून वाशी येथे माथाडी कामगार म्हणून रुजू झाले. तर, बारावी शिकलेली सिद्धी हिची आई आशा या गृहिणी असून, लहान भाऊ साई हा मुंबईत एमबीएचे शिक्षण घेत आहे.
सिद्धी हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण मॉर्डन स्कूल वाशी- नवी मुंबई येथे झाले. वाणिज्य शाखेतून बारावीचे शिक्षण भारती विद्यापीठ मुंबई येथे घेतले. तर, मुंबई युनिव्हर्सिटी येथे वाणिज्य पदवी पूर्ण केली. बारावीपासूनच तिने सीएसाठी अभ्यासाला सुरुवात केली. मुळातच लहानपणापासून सीए होण्याचे स्वप्न पाहिलेल्या सिद्धी हिला दोन वेळा अपयश आले. परंतु तीने हार न मानता आणि आई वडिलांनी कष्ट करून शिकण्यासाठी दिलेले प्रोत्साहन पाहून जिद्दीने सीए होऊन आपले स्वप्न सत्यात उतरवले. यासाठी शिक्षक,आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले. तिने दररोज दहा तास अभ्यास केला. तसेच, एक वर्ष क्लास लावला होता. भोर तालुक्यातील आंबवडे खोरे तसेच चिखलगावमधून तिचे अभिनंदन होत आहे.

अपयश आले तरी खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न केले की यश नक्कीच मिळते. मला मिळालेल्या यशात आई वडिलांचे प्रोत्साहन व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. आई वडीलांच्या कष्टाच्या मोलातून मिळालेल्या शिक्षणाने जीवन यशस्वी होण्यास मदत झाली असून त्यांचे ऋण विसरता येणार नाहीत.
- सिद्धी धोंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com