निसर्गरम्य नागेश्वराचे मंदिरात लाभते मनःशांती
मन प्रसन्न करणारे पांडवकालीन नागेश्वर मंदिर
विलास मादगुडे : सकाळ वृत्तसेवा
हिर्डोशी : आंबवडे (ता. भोर) येथील श्री नागेश्वराचे मंदिर हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. नागेश्वर मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून आंबा, चिंच व इतर अनेक प्रकारच्या दाट झाडींनी व्यापलेला आहे. कोणत्याही ऋतूत येथे दर्शनासाठी आल्यावर मनःशांती लाभून मन प्रसन्न होते. श्रावणी सोमवारी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होते.
आंबवड्यात आल्यावर प्राचीन जिजीसाहेब झुलता पुलावरून पायी तर रायरेश्वराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून नागेश्वर मंदिराकडे जाता येते. झुलत्या पुलावरून पलीकडे गेल्यावर समोरच भोर संस्थानचे संस्थापक श्रीशंकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी आहे. मंदिराकडे जाण्यासाठी दोन बाजूने झाडीतून दगडी पायऱ्या उतरल्यावर खोलगट भागात असलेल्या नागेश्वर मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या भोवती पंचगंगा, फरसबंदी प्रांगण, तट, ओवऱ्या, पाण्याची कुंडे व पाण्याचे वाहते प्रवाह आहेत. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराभोवती आतील स्तंभ शिल्पकलेने नटलेले आहेत. बाह्य भिंतीवर नक्षीकाम केलेले तर शिखर कोरीव आहे.
मंदिर शिलाहार अथवा यादवकालीन असून, मंदिराच्या पायऱ्या चढल्यावर सुंदर नंदी, सभागृहात कोरलेला मोठा कूर्म, गर्भगृहात मधोमध नागेश्वराचे लिंग, डाव्या बाजूस पितळी घंटा, लिंगाच्या वर तांब्याचे अभिषेक पात्र आहे. मंदिराच्या मागील बाजूस दगडी दीपमाळ आहे. देवड्यांमधील मूर्तीसुद्धा अतिशय पुरातन आहेत.
ूूूूूमंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग :
भोर शहरापासून १३, तर पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर आंबवडे गाव आहे.
श्रावणातील धार्मिक कार्यक्रम
१. अभिषेक, रुद्राभिषेक
२. प्रवचन, भजन, कीर्तन
३. नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर
ट्रस्टने केलेल्या उपाययोजना
१. आरोग्य केंद्राभोवती मोकळ्या पटांगणात वाहनतळाची सोय
२. दर्शनासाठी गर्दीवेळी रांगा लावण्याचे नियोजन
३. अभिषेक, पूजेसाठी देवालयात पुजारी उपलब्ध
४. सुरक्षितेसाठी स्वयंसेवक, सीसीटीव्हीचा वापर
याचे पालन करा
- झुलत्या पुलावर प्रमाणापेक्षा जास्तीची गर्दी टाळावी
- निसरड्या पायऱ्यांवरून जपून चालावे
- शेजारी असलेल्या ओढ्यातील पाण्यात उतरणे टाळावे
- हुल्लडबाजी टाळावी
मदतीसाठी संपर्क
- भोर पोलिस ठाणे : ०२११३-२२२५३३
- रुग्णवाहिका : १०२ आणि ९०४९३०१६१९
वर्षभर नेहमीच भाविक, पर्यटक आंबवडे येथे येतात. ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच ट्रस्टकडून मंदिर परिसरातील विकासकामांचा आराखडा तयार केला असून, आगामी काळात भाविक, सीएसआर निधी तसेच शासनाच्या माध्यमातून परिसराला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल.
- रणधीर जेधे, मानद सचिव, श्री नागेश्वर देव ट्रस्ट, आंबवडे
02208, 02206
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.