रायरेश्‍वरवरील पांडवकालीन मंदिर पर्यटकांचे आकर्षण

रायरेश्‍वरवरील पांडवकालीन मंदिर पर्यटकांचे आकर्षण

Published on

विलास मादगुडे
हिर्डोशी, ता. २ : किल्ले रायरेश्‍वर (ता. भोर) पठारावरील रायरेश्‍वराच्या पांडवकालीन मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ मध्ये मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. या ऐतिहासिक मंदिरात पुणे, सातारा जिल्ह्यासह राज्यातून भाविक पर्यटन, दर्शनासाठी येतात. त्यात भोर, वाई तालुक्यातील भाविकांची नेहमीच गर्दी असते. स्वराज्याची शपथ हा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आजही हे मंदिर भाविकांचे आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून नुकताच पुरातत्त्व विभागाने मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.
शिवमंदिराची रचना दगडी खांबांवर आधारित आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराच्या दगडी भिंतीवर स्वराज्य शपथेचे चिन्ह कोरलेले आहे. मंदिराशेजारी भवानी मातेचेही मंदिर आहे. १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटकातून शिवा नावाच्या जंगम पुजाऱ्याला या मंदिराच्या पूजेसाठी आणले होते. तेव्हापासून जंगम कुटुंब येथे वास्तव्यास असून, सध्या येथे ४० घरे आणि ३००‌ हून अधिक लोकसंख्या आहे. जंगम कुटुंब मंदिराची पूजा आणि देखभाल करते.

निसर्गप्रेमींसाठी नंदनवन
रायरेश्‍वर पठार हे २.५ किलोमीटर रुंद आणि १२ किलोमीटर लांब आहे. येथील पांडवकालीन लेणी, जलकुंड, सात रंगांची माती यासह पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणारे धबधबे, धुके, आणि हिरवेगार निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे रायरेश्‍वर पठार धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळाबरोबरच निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे.

किल्ल्यावर जाण्याचे मार्ग
- भोरपासून २६ तर पुण्याहून पासून साधारण ८५ किलोमीटर अंतर
- भोरहून आंबवडे, कोर्ले मार्गे पायथ्यापर्यंत वाहनाने आणि तेथून लोखंडी शिडीने पठारावर पायी जाता येते
- भोरहून निगुडघर, रायरी (धारांबे) गावातून नव्याने लावलेल्या लोखंडी शिडीने पायी पठारावर जाता येते.

सोयी सुविधा
- अभिषेकासाठी पुजारी उपलब्ध
- पायथ्यावर वाहनतळाची उपलब्धता
- ऑर्डरनुसार स्थानिकांकडून फराळ, चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय
- रायरेश्‍वर ग्रामस्थ संस्थेकडून देखभाल

भोर पोलिस ठाणे - (०२११३) - २२२५३३
रुग्णवाहिका - १०२ साठी संपर्क ९०४९३०१६१९
स्थानिक बचाव पथक - ९२७२७१८००८

पर्यटकांना आवाहन -
- शिडीचा काळजीपूर्वक वापर करावा, शिडीवर गर्दी करू नये
- धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा
- धोकादायक धबधबे, पाण्याच्या प्रवाहात उतरू नये
- पठारावरील डोंगराच्या कडेला जाऊ नये
- हुल्लडबाजी, धांगडधिंगा करू नये
- कचराकुंडीचा वापर करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com