भोरमधील पऱ्हरमध्ये हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू
हिर्डोशी,ता.३१ : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण रिंग रोडवरील दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या पऱ्हर बुद्रुक गावातील शेतकरी गणपत जाणू डोईफोडे यांच्या चरायला सोडलेल्या २० शेळ्यांपैकी ४ शेळ्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.३१) उघड झाली आहे. २० पैकी १० शेळ्या अद्याप गायब असून ६ शेळ्या घरी परतल्या आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी डोईफोडे यांच्या आई रखमाबाई डोईफोडे या मंगळवारी (ता. ३० डिसेंबर) दुपारी २० शेळ्या घेऊन गावच्या डोंगराच्या बाजूला चरायला घेऊन गेल्या होत्या. सायंकाळच्या वेळी चरत असताना शेळ्या अचानक बुजल्याने सैरावैरा रानात इकडे तिकडे पळून गेल्या. अंधार पडायला लागेपर्यंत शोध घेऊनही शेळ्या सापडल्या नसल्याने रखमाबाई घरी परतल्या. घरी आल्यावर त्यांनी कुटुंबातालीत सदस्यांना सांगितले. परंतु, रात्र झाल्याने शोध घेणे अशक्य झाले. २० पैकी ६ शेळ्या रात्रीत घरी आल्या. मात्र,१४ शेळ्या सकाळपर्यंत घरी न आल्याने शेतकरी कुटुंबासह शोधण्यासाठी रानात गेले असता त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे भीतीने सर्वजण घरी पळाले. बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचे बरेवाईट झाल्याच्या संशयाने शेतकरी डोईफोडे यांनी वनविभागाला कळवले. हिर्डोशी वनविभागाचे वनपाल रोहन इंगवले व रायरी बीटचे वनरक्षक नरेश भोई, तसेच शेतकरी डोईफोडे,पत्नी वैशाली डोईफोडे, रखमाबाई डोईफोडे, रोहिदास आखाडे, लक्ष्मण आखाडे, जाणू आखाडे, विकास आखाडे यांनी चरायला गेलेल्या ठिकाणी शोध सुरू केला. चार तासांच्या शोधकार्यात खालची धानवली जवळील दापकेघर हद्दीतील मालकी हद्दीत असलेल्या कड्याच्या वरच्या बाजूस दोन व खालच्या बाजूस दोन अशा चार शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या. शेळ्यांच्या मानेवर जखमा आढळून आल्याने बिबट्याचा हल्ला झाल्याचे निष्पन्न आले; परंतु शोध घेऊन उर्वरित १० शेळ्या बुधवारी सायंकाळपर्यंत सापडल्या नाहीत.
खासगी रानात झाडी असून वरच्या बाजूला वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असल्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना वनविभागाकडे रीतसर अर्ज करण्यास सांगितले आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
- रोहन इंगवले, वनपाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

