

हिर्डोशी, ता. १२ : कामगारविरोधी नवीन श्रमसंहिता रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी भोरमधील अंगणवाडी सेविकांनी निदर्शने करीत भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने गुरुवारी (ता. १२) राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होत त्यांनी ही निदर्शने केली.
कामगारविरोधी नवीन श्रमसंहिता रद्द करून जुने कामगार कायदे पुनः प्रस्थापित करावेत, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, आठ तासांच्या कामासाठी दरमहा किमान ३० हजार वेतन, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र सर्वसमावेशक कायदा, प्रोत्साहन भत्ता, मानधनात वाढ, सेवानिवृत्त पेन्शन, मोबाईल रिचार्ज आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
भोर पंचायत समिती व तहसिल कार्यालयासमोर कर्मचारी संघाकडून हातात मागण्यांचे फलक धरून, घोषणा देत ही निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव कॉ. विठ्ठल करंजे, भोर तालुका अध्यक्षा महानंदा जेधे, सचिव सुनिता ढिले, वैशाली राऊत, कमल खंडाळे, मनिषा पडवळ, किर्ती शिर्के, सुलभा जोशी, कमल पांगारकर, संगिता खंडाळे, सुरेखा पवार, सुजाता वीर, सुवर्णा बांदल या उपस्थित होत्या. तसेच, यापुर्वी भोर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.