भोरमध्ये खोकल्याच्या औषधाचा तुटवडा

भोरमध्ये खोकल्याच्या औषधाचा तुटवडा

Published on

हिर्डोशी, ता. २६ : भोरमधील उपजिल्हा रुग्णालयात खोकल्याच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून औषधांच्या मुबलक पुरवठ्याची मागणी केली आहे.
भोर शहरातील रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात भोर शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. कामकाजाच्या वेळेत दिवसभरात ३००हून अधिक रुग्ण वेगवेगळ्या उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. त्यात ताप, सर्दी व खोकला आदी साथीच्या रुग्णांची संख्या जास्त असते. सरकारी दवाखान्यातील खोकल्याच्या औषधाचा गुण हमखास येत असल्याने औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णांना खोकल्याचे औषध मिळत नसल्याने नाराजी होत आहे. वेळप्रसंगी खासगीतून औषधे खरेदी करावी लागत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच रुग्णांच्या नाराजीला रुग्णालयाला तोंड द्यावे लागत आहे. यातूनच रुग्णालयात शाब्दीक वादही होताना दिसत आहेत.
याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे म्हणाले, ‘‘दररोजच्या बाह्यरुग्ण तपासणीत जवळपास १००हून अधिक खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी येत असून प्रत्येकाची मागणी खोकल्याच्या औषधाची बाटली मिळण्याची असते. त्यामुळे उपलब्ध साठा अपुरा पडत आहे. सरासरी दररोज खोकल्याचे १२५ रुग्ण धरले तर सुट्टीचे दिवस सोडून महिन्याला ३ हजार औषधांच्या बाटल्यांची गरज असून त्याची मागणीही केली जाते. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक असणारा औषध साठा उपलब्ध झाला नसल्याने तुटवडा भासत आहे.’’


‘‘गेल्या दोन महिन्यांपासून खोकला, पित्ताचे औषधे मिळत नाही. दोन-चार दिवस ठिक आहे पण दोन महिन्यांपासून असे घडत आहे. औषध उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ रुग्णांना हेलपाटे मारावे लागतात. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध करावा."
-राजेंद्र आवाळे, भोलावडे

‘‘सरार्स येणाऱ्या रुग्णांची मागणी खोकल्याच्या औषधांची असल्याने तुटवडा भासत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यकता असलेल्या रुग्णांनाच खोकल्याचे औषध देण्यात येणार आहे. औषधांची मागणी केली आहे.
-डॉ. महेश गुडे, वैद्यकीय अधीक्षक

गेल्या तीन महिन्यांचा मागणी आणि पुरवठा झालेला औषधसाठा
(महिना- मागणी -पुरवठा)
डिसेंबर - ३०००- ९६०
जानेवारी - ३०००- ६००
फेब्रुवारी - ३०००- ७२०

Marathi News Esakal
www.esakal.com