सिम्बाच्या लागवडीने वाढला कलिंगड उत्पन्नाचा गोडवा

सिम्बाच्या लागवडीने वाढला कलिंगड उत्पन्नाचा गोडवा

Published on

हिर्डोशी, ता. १५ : करंजे (ता. भोर) येथील शेतकरी संतोष गोपाळ कुडले यांनी सायबेज आशा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली २० गुंठ्यांत सिम्बा जातीच्या कलिंगडाची लागवड केली व १० टनाचा उत्पादन घेतले. कुडले यांनी सलग दुसऱ्या वर्षीही अवघ्या दोन महिन्यांत एक लाख २० हजार उत्पन्न मिळवले.
कुडले यांनी चार जानेवारीला ४ हजार ५०० कलिंगड रोपांची (प्रतिरोप तीन रुपये दराने) लागवड केली. सायबेजकडून मल्चिंग पेपर, रोपे, चिकट सापळे तसेच तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले. साधारण दोन ते अडीच महिन्यांत काढणीस येत असलेल्या सिम्बा कलिंगडाची वाढ चांगली झाल्याने गेल्या चार दिवसांपासून तोड सुरू केली. व्यापाऱ्यांना १० टन कलिंगडाची विक्री शेताच्या बांधावर बुधवारी (ता. १२) प्रतिकिलो १२ रुपये दराने केली आहे.
कुडले यांना खत, औषधे व मजुरीसाठी ३० हजार खर्च आला. कलिंगड व झेंडूची रोपे, मल्चिंग पेपर आदींसाठी अंदाजे ४२ हजारांची मदत सायबेज संस्थेकडून मिळाली. त्यामुळे सायबेजची मदत सोडली तर शेतकऱ्याला अवघा ३० हजार रुपयांचा खर्च आला. कुडले यांना वडील गोपाळ कुडले, आई पार्वती व पत्नी प्रियंका यांचे शेतीकामासाठी सहकार्य लाभले.

झेंडूचे आंतरपीक
कलिंगड पिकामध्ये कुडले यांनी आंतरपीक म्हणून चार हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. रोपे सायबेज संस्थेकडून मिळाली आहेत. पाडव्याला झेंडू पिकातून ३० हजार अतिरिक्त उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली असून या उत्पादनातून झालेला खर्च निघणार आहे.

सायबेजकडफन २८ गावे दत्तक
भोर तालुक्यात सायबेज आशा संस्थेने २८ गावे दत्तक घेतली असून त्या गावातील शेतकऱ्यांना संस्था आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक मदतीसह मार्गदर्शन करत आहे.

दृष्टिक्षेपात खर्च
१३,५००......(कलिंगड रोपे),
१२,०००...... (झेंडू) सायबेज कडून
१६,५००..... मल्चिंग व इतर- (सायबेजकडून)
२५,०००.....खत, औषधे -
५,०००...मजुरी


१०.... टन कलिंगडाची विक्री
१२ रुपये .... प्रतिकिलो
उत्पन्न.....१ लाख २०,०००


सायबेजकडून मिळालेल्या अर्थसाहाय्यामुळे नावीन्यपूर्ण शेती करण्यास चालना मिळाली. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक पद्धतीच्या शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन शेतीतून हमखास उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळून उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे."
- संतोष कुडले, शेतकरी करंजे

03222

Marathi News Esakal
www.esakal.com