''केव्हीके''च्या कृषी प्रदर्शनाचे उद्या उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''केव्हीके''च्या कृषी प्रदर्शनाचे उद्या उद्‌घाटन
''केव्हीके''च्या कृषी प्रदर्शनाचे उद्या उद्‌घाटन

''केव्हीके''च्या कृषी प्रदर्शनाचे उद्या उद्‌घाटन

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ७ : येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) वतीने ग्लोबल कृषी महोत्सव- २०२३ अंतर्गत नारायणगाव येथे आयोजित केलेल्या चार दिवशीय पीक परिसंवाद, पीक प्रात्यक्षिक व कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ९) सकाळी दहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती केव्हीकेचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.
या कार्यक्रमास आमदार अतुल बेनके, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजीआमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पद्मश्री राहीबाई पोपरे, भाजप नेत्या आशा बुचके, कृष्णचंद्र सिसोदिया, वासुदेव काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मेहेर म्हणाले, की ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान चार दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत कृषी प्रदर्शन पाहण्यास खुले राहणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या ८० एकर प्रक्षेत्रावर आंबा, डाळिंब, पेरू आदी फळे तसेच संरक्षित शेतीतील ढोबळी मिरची लागवड, कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा इत्यादी. पिकांचे प्रात्यक्षिके, नैसर्गिक शेतीवर आधारित परसबाग, झेंडू व शेवंती फुलांच्या ३५ जाती, धान्य महोत्सव, परसबागेतील कोंबडी पालनांच्या विविध जाती आदी प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पीक परिसंवादामध्ये नैसर्गिक शेती, भरडधान्याचे महत्त्व व पोषण सुरक्षा, फुलशेती, ऊस आदी पिकांचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान व विपणन, आयुर्वेदिक पशू उपचार पद्धती आदी विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

कृषी प्रदर्शनाचा समारोप १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी दोन वाजता माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते ग्रामोन्नती मंडळ संचलित श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिर, अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र यांच्या इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी ग्रामोन्नती कृषी सन्मान २०२३ पुरस्कार वितरण, शिवजन्मभुमीची आम्रगाथा, या आंबा उत्पादन मार्गदर्शिका पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

03331