चोरीला गेलेल्या तंबाखू बटव्याची शोध मोहीम फत्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीला गेलेल्या तंबाखू बटव्याची शोध मोहीम फत्ते
चोरीला गेलेल्या तंबाखू बटव्याची शोध मोहीम फत्ते

चोरीला गेलेल्या तंबाखू बटव्याची शोध मोहीम फत्ते

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १८ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अनेक मोठ्या चोऱ्या व दरोड्यांतील गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलिस आरोपींना जेरबंद करतात. मात्र नारायणगाव येथे चोरीची एक आगळीवेगळी घटना घडली आहे. आर्वी (ता. जुन्नर ) येथील एका नामांकित बैलगाडा मालकाने चोरीला गेलेला तंबाखूच्या बटव्याचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून काढला. चोरीला गेलेल्या तंबाखूच्या बटव्याच्या शोध मोहिमेची खमंग चर्चा सध्या सुरू आहे.

आर्वी (ता. जुन्नर ) येथील एक नामांकित बैलगाडा मालक स्टँप खरेदीसाठी नारायणगाव येथील शिवाजी चौकातील दस्तलेखनिक रवींद्र कोडीलकर यांच्याकडे आले होते. त्यांनी तंबाखू खाल्ल्यानंतर घाईगडबडीत तंबाखूचा बटवा टेबलवर ठेवला. दरम्यान ते कोडीलकर यांच्याशी चर्चा करत असताना टेबलावर ठेवलेला बटवा गायब झाला. बराच वेळ शोध घेतला, मात्र तंबाखूचा बटवा सापडला नाही. या मुळे बैलगाडा मालक अस्वस्थ झाले. याबाबत कोडीलकर यांनी चौकशी केली असता ते म्हणाले, ‘‘येथे ठेवलेला माझा तंबाखूचा बटवा गायब झाला आहे. तंबाखूचा बटवा गायब झाल्याचे मला दुःख नाही, मात्र त्या बटव्यात असलेली व जिवापाड जपलेली खास घडण असलेली पितळी धातूची चुना डबी त्यासोबत हरवली आहे. माझ्या दृष्टीने लाख मोलाची खास बनवून घेतलेली पितळी धातूची डबी हरविल्याचे दुःख मला झाले आहे. कितीही खर्च झाला तरी चालेल, पण मला पितळी डबी हवी आहे.’’

बैलगाडा मालकाची झालेली अवस्था व त्यांचे असलेले पितळी चुन्याच्या डबीवरील प्रेम पाहून कोडीलकर यांनीसुद्धा हरवलेल्या तंबाखूच्या बटव्याची शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, कोडीलकर यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता कपाळाला गंध, डोक्यावर टोपी व गळ्यात तुळशी माळ असलेल्या व्यक्तीने टेबलवरील बटवा अलगद उचलून खिशात घातल्याचे दिसून आले. चौकशीअंती बटवा नेणारी व्यक्ती मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बैलगाडा मालक दस्तलेखनिक कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन मांजरवाडी येथे रवाना झाले. एक तासाच्या प्रयत्नानंतर बटवा नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यश आले. सदर व्यक्तीने चूक कबूल केली. माफी मागून तंबाखूच्या बटव्यासह पितळी डबी बैलगाडा मालकाच्या स्वाधीन केली. तंबाखूच्या बटव्यासह पितळी डबी मिळाल्याने बैलगाडा मालक आनंदित झाले.
मात्र, या चोरीला गेलेला तंबाखूचा बटवा व या आगळ्या-वेगळ्या चोरीच्या शोध मोहिमेची खमंग चर्चा सध्या सुरू आहे.