विधानसभेच्या इच्छुकांचा जीव टांगणीला

विधानसभेच्या इच्छुकांचा जीव टांगणीला

रवींद्र पाटे : रवींद्र पाटे
नारायणगाव, ता. ५ : आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशा बुचके, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे तालुक्यातील हे दिग्गज नेते महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने असतानादेखील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जुन्नर विधानसभा मतदारसंघात ५१ हजार ३९३ मतांची मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विजयी झाल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असा इशारा या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे कोणाचा कार्यक्रम करणार, कोणाला उमेदवारी देणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत आमदार बेनके हे कोल्हे यांचे प्रचार प्रमुख होते. माजी आमदार सोनवणे, भाजप नेत्या बुचके हे आढळराव पाटील यांच्यासोबत होते. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आमदार बेनके यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बेनके समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले, विजय कुऱ्हाडे, सूरज वाजगे, बाजीराव ढोले, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बेनके एकाकी पडले. त्यात आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे जुन्नर विधानसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बेनके, शिवसेनेचे माजी आमदार सोनवणे, भाजप नेत्या आशा बुचके यांच्यावर पडली. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या या तीनही नेत्यांमध्ये निवडणूक प्रचारात ताळमेळ नव्हता. दुसऱ्या बाजूने खासदार डॉ. कोल्हे यांची प्रचार यंत्रणा काँग्रेसचे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, योगेश पाटे, संभाजी तांबे, शरद चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर यांनी राबवली. डॉ. कोल्हे यांच्या प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकसंधपणा होता.

माळी व मुस्लिम फॅक्टर
मागील लोकसभा निवडणुकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघात डॉ. कोल्हे यांना ४१ हजार ५५१ मतांची आघाडी मिळाली होती. सन २०२४च्या निवडणुकीत ५१ हजार ३९३ मतांची आघाडी मिळाली. आघाडीत या वेळी ९ हजार ८४२ मतांची वाढ झाली. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे फोडाफोडींचे राजकारण, विरोधी नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई, कांदा प्रश्न, शेतमालाला बाजारभावाचा अभाव, बेरोजगारी, संविधान वाचवायचे असेल तर भाजपला हटवा, अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली चर्चा, मराठा आरक्षण आंदोलन, यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, मागासवर्गीय, मुस्लिम समाज यांच्यामध्ये भाजपविषयी नाराजी होती. याचा फायदा डॉ. कोल्हे यांना झाला. मुस्लिम व माळी समाजाची एक गठ्ठा मते डॉ. कोल्हे यांना मिळाल्याची चर्चा आहे.

विधानसभेला घड्याळ, लोकसभेला तुतारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंडखोरी व माजी खासदार आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश याचा राग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला होता. शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. अनेक वर्षे ज्यांच्या विरोधी काम केले, त्यांचे काम आम्ही करणार नाही. विधानसभेला घड्याळ, लोकसभेला तुतारी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शेरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले, शरद लेंडे हे इच्छुक आहेत. विधानसभेसाठी शेरकर यांना शब्द दिल्याची चर्चा आहे. खासदार डॉ. कोल्हे यांची उमेदवारी देण्याबाबतची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सद्यःस्थितीत आमदार बेनके, माजी आमदार सोनवणे, भाजप
नेत्या बुचके हे महायुतीचे घटक आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती राहिल्यास आमदार बेनके यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने माजी आमदार सोनवणे, भाजप नेत्या बुचके यांचे राजकीय भवितव्य काय? ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील निवडणुकीत हे तिन्ही उमेदवार होते. त्यात बेनके यांनी सोनवणे यांचा ९ हजार ६८ मतांनी पराभव केला होता. विधानसभेला तिरंगी चौरंगी लढत झाल्यास मत विभागणीमुळे लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही.

महत्त्वाचे प्रश्न
जुन्नर विधानसभा मतदारसंघात बिबट्याचा प्रश्‍न, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न, द्राक्ष निर्यातीवरील वाढलेले आयात शुल्क, कांद्याचे बाजार भाव, रासायनिक खते, कीटकनाशके, शेती अवजारांवरील जीएसटी, शेतीपूरक व्यवसाय, आदिवासी भागातील आरोग्य, उन्हाळ्यातील पाणीटंचाई, दळणवळण हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com