अष्टविनायक राष्ट्रीय महामार्गावर वृक्षतोड

अष्टविनायक राष्ट्रीय महामार्गावर वृक्षतोड

Published on

नारायणगाव, ता. ८ : नारायणगाव ते मांजरवाडी अष्टविनायक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ८० वर्षांपूर्वीच्या तीन महाकाय वटवृक्षांचा बळी गेल्यानंतर वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडबडून जाग आली. वनविभागाने घटनास्थळी आज दुपारी भेट देऊन तोडलेल्या वटवृक्षांचा पंचनामा केला. पंचनामा अहवालानुसार चौकशी करून संबंधितांवर वनविभागाच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
शेतजमिनीच्या प्लॉटिंगसाठी अडथळा ठरत असल्याने कायदा हातात घेऊन येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो उपबाजारासमोरील अष्टविनायक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या तीन महाकाय वटवृक्षांची अज्ञात व्यक्तीने यांत्रिक करवतीचा वापर करून कत्तल केली आहे. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
मांजरवाडी रस्त्यालगतच्या वटवृक्षतोडीची घटना ताजी असतानाच आज येथील कृषी विज्ञान केंद्राजवळ असलेल्या पुणे-नाशिक महामार्गालगतच्या वटवृक्षाच्या फांद्या तोडण्याची दुसरी घटना घडली. शोरूमला अडथळा ठरत असल्याचे कारण सांगून जागा मालकाने वटवृक्षाच्या फांद्या खोडापासून तोडल्याचे आढळून आले. या दोन्ही ठिकाणी आज दुपारी वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे (खेड सिन्नर) रस्ते पाहणी अधिकारी विशाल पाटे यांनी भेट दिली. रस्ते पाहणी अधिकारी पाटे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील झाडे विनापरवाना तोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दोन्ही ठिकाणच्या तोडलेल्या झाडांच्या नुकसानीचा पंचनामा केला. पंचनामा अहवाल जुन्नर येथील उपविभागीय कार्यालयाला पाठवण्यात आला आहे.

कोणतीही परवानगी नसताना दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्गालगतचे वटवृक्ष तोडण्याच्या घटना घडल्या आहेत. मांजरवाडी रस्त्यालगतचे सुमारे साडेतीन मीटर व्यास असलेले तीन महाकाय वटवृक्ष तोडण्यात आले आहेत. तर इतर वटवृक्षांच्या फांद्या तोडल्या आहेत. तसेच पुणे-नाशिक महामार्गालगतच्या एका वटवृक्षाच्या एक ते दीड फूट व्यास असलेल्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. दोन्ही ठिकाणच्या नुकसानीचा पंचनामा तयार करण्यात आला असून हा अहवाल जुन्नर येथील कार्यालयात पाठवण्यात आला आहे.
- अनिता होले, वनपाल.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीतील मोठ्या वटवृक्ष तोडीची घटना दुर्दैवी आहे. संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. वृक्षतोडीचा पंचनामा केला आहे. ज्या व्यक्तींनी यांत्रिक करवती वापरून वृक्ष तोडण्याचे काम केले, ज्यांनी वृक्ष तोडण्यास सांगितले त्यांच्यावर वनविभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. झाडे तोडण्यासाठी वापरलेले साहित्य, वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त करण्यात येतील.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर

ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. कायद्याचा धाक न राहिल्याने महामार्गालगत वृक्षतोडीच्या घटना घडत आहेत. ८० वर्षांपूर्वीच्या महाकाय वटवृक्षांचा बळी गेल्यानंतर नुकसानीचा पंचनामा झाला. कारवाई झाली तरी तुटलेली झाडे पुन्हा येतील का?
- रमेश भोसले, वृक्षमित्र

NAR24B05224

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.