जुन्नरमध्ये द्राक्ष उत्पादनात होणार ५० टक्के घट

जुन्नरमध्ये द्राक्ष उत्पादनात होणार ५० टक्के घट
Published on

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता.२ : जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम यावर्षी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीस टक्के बागेतील घड जिरल्यामुळे अल्प घडनिर्मिती झाली असून घडाचा आकार लहान आहे. या वर्षी द्राक्ष उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होणार आहे. याचा फटका सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील प्रामुख्याने काळ्या जम्बो जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे.

घडनिर्मिती न झाल्यामुळे सुमारे दीडशे एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. जुन्या द्राक्ष बागा काढून पावसाळी वातावरणात तग धरणाऱ्या नवीन परदेशी पेटंट व्हरायटीच्या द्राक्ष बागा लावण्याच्या तयारीत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आहेत.
जुन्नर तालुका प्रामुख्याने काळ्या जातीच्या (ब्लॅक) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यातील जम्बो द्राक्षाने प्रामुख्याने चीन, बांगलादेश, दुबई, श्रीलंका आदी देशातील बाजारपेठ काबीज केली आहे.
तालुक्यात सुमारे चार हजार एकर क्षेत्रात जम्बो, रेडग्लोब, शरद सीडलेस, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, सोनाका, किंगबेरी, क्रिमसन आदी जातीच्या द्राक्ष बागा आहेत. यावर्षी एप्रिल, मे महिन्याच्या खरड छाटणीनंतर तापमान ४० अंशसेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने व सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील माल छाटणीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्ष घड निर्मितीवर मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

पावसामुळे अल्प घडनिर्मिती
बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम जम्बो, रेडग्लोब, किंगबेरी या जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे. सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही. पावसामुळे तीस टक्के बागेतील घड जिरल्यामुळे बागेत अल्प घडनिर्मिती झाली असून घडाचा आकार लहान आहे. संप्रेरकांचा वापर करून द्राक्ष मण्यांचा व घडांचा आकार मोठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, बँका अडचणीत
मागील पाच ते सहा वर्षांपासून वादळी पाऊस, गारपीट या बदलत्या हवामानाचा परिणाम द्राक्ष बागेवर होत आहे. द्राक्ष पीक भांडवली व वार्षिक आहे. नवीन द्राक्ष बाग तयार करण्यासाठी किमान सात ते आठ लाख रुपये खर्च येतो. हंगाम वाया गेल्यास शेतकरी व पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, बँका अडचणीत येतात.तालुक्यात वर्षभरात जुन्या द्राक्ष बागा तोडून सुमारे २०० एकर क्षेत्रात आरा रेड सिलेक्शन ५/६ या पेटंट व्हरायटीच्या द्राक्षाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यात द्राक्ष उत्पादनात ५० ते ६० टक्के घट होणार आहे. ग्लोबल वार्मिंगच्या परिणामामुळे जुन्या बागा तोडून पावसाळी वातावरणात तग धरणाऱ्या परदेशी जातीच्या द्राक्षाची लागवड या वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. जुन्या बागा तोडाव्या लागत असल्याने शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे.
- अवधूत बारवे, द्राक्ष उत्पादक

द्राक्ष बागावर फवारली जाणारी औषधे व खत विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात दरवर्षी सुमारे ६० कोटी रुपयांची उलाढाल होते. शेतमजूर, ट्रॅक्टर, क्रेट, वाहतूक आदींच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाच हजार नागरिकांना रोजगार मिळाला आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी द्राक्ष लागवडीसाठी केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज असून निर्यात शुल्क कमी करण्याची गरज आहे.
- सतीश पाटे, अध्यक्ष : शिवतेज ग्रुप, नारायणगाव

विविध सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेने तालुक्यातील सुमारे एक हजार द्राक्ष बागायतदारांना तीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. नवीन लागवडीसाठी एकरी ५ लाख ८० हजार रुपये तर जुन्या लागवडीसाठी १ लाख ८४ हजार रुपये कर्ज दिले आहे.
- बी.पी.मुरादे, विभागीय अधिकारी पुणे जिल्हा बँक

द्राक्ष बागांचे आर्थिक गणित:
* नवीन लागवडीसाठी खर्च: एकरी सात ते आठ लाख रुपये
(लोखंडी मंडप, खते, फवारणी, मशागत, ठिबक, कुशल मनुष्यबळ, खते, कीटक व बुरशी नाशके आदी)
* जुन्या बागांचा भांडवली खर्च : एकरी साडेतीन ते चार लाख रुपये.
* नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान न झाल्यास मिळणारे एकरी सरासरी वार्षिक उत्पन्न चार ते सहा लाख रुपये.


05896

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com