देशांतर्गत द्राक्ष विक्री उत्पादकांची पसंती
नारायणगाव, ता.४ : तापमान वाढीबरोबर द्राक्षाची गोडी वाढल्याने द्राक्षाला मागणी वाढली आहे. बाजारभावातही तेजी आहे. निर्यातक्षम द्राक्षाबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेत सुद्धा या वर्षी द्राक्षाला समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. वाढलेली मजुरी, पॅकिंगचा खर्च आदींचा विचार करता तालुक्यातील बहुतेक जम्बो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा कल यावर्षी प्रथमच देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्ष विक्री करण्याकडे दिसून येत आहे.
निर्यातक्षम द्राक्षाच्या तुलनेत देशांतर्गत बाजारपेठेत प्रतिकिलोग्रॅम पंधरा ते वीस रुपये बाजारभाव कमी मिळत आहे. मात्र निर्यातक्षम द्राक्षाची तोडणी पॅकिंग करण्यासाठी प्रतिकिलोग्रॅम १० ते १५ रुपये वाढीव मजुरी खर्च येतो. निर्यातक्षम द्राक्षाची पॅकिंग करण्यासाठी निवड करावी लागते. या मध्ये मण्यांची गळ होऊन एकरी एक ते दीड टन द्राक्षाचे नुकसान होते. याचा विचार करता यावर्षी तालुक्यातील बहुतेक शेतकरी देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाची विक्री करताना दिसत आहेत.
द्राक्षांची सध्याची स्थिती
१. ७० टक्के बागातील द्राक्ष काढणी पूर्ण
२. द्राक्ष उत्पादनात सुमारे चाळीस टक्के घट झाली आहे.
३. ही स्थिती राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूरमध्येही.
४. मागणी व उत्पादन यामध्ये फरक पडल्यामुळे यावर्षी द्राक्षाला चांगला भाव
१०० ते १४० रुपयांदरम्यान बाजारभाव
निर्यातक्षम जम्बो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या व रेड ग्लोब, क्रीमसन या रेड जातीच्या द्राक्षाला मण्यांचा आकार, रंग या नुसार प्रति किलोग्रॅम शंभर ते १४० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोनाका, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस या पांढऱ्या जातीच्या द्राक्षाला मण्यांची लांबी, चव व रंग यानुसार प्रतिकिलोग्रॅम साठ ते नव्वद रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे.
घट झाल्याने द्राक्षाला यंदा वाढीव बाजारभाव
मागील वर्षी मार्च महिन्यात निर्यातक्षम ब्लॅक व रेड जातीच्या द्राक्षाला प्रतवारीनुसार प्रति किलोग्रॅम ७० ते १०० रुपयांच्या दरम्यान तर पांढऱ्या जातीच्या द्राक्षाला प्रति किलोग्रॅम ४० ते ५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. मागील वर्षी निर्यातक्षम ब्लॅक व रेड जातीच्या द्राक्षाचे एकरी उत्पादन दहा ते बारा टन निघाले होते. यावर्षी सरासरी पाच ते सहा टन एकरी उत्पादन निघत आहे. उत्पादनात घट झाल्याने यावर्षी द्राक्षाला वाढीव बाजारभाव मिळत आहे.
राज्यात यंदा द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादनात तालुक्यातील शेतकरी अग्रेसर आहेत. यामुळे समाधानकारक बाजारभाव मिळत आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचा विचार करून द्राक्ष उत्पादकांचा कल ब्लॅक ऐवजी रेड व्हरायटी लागवडीकडे वाढला आहे. जम्बो, शरद सीडलेस, किंगबेरी या ब्लॅक द्राक्षाच्या तुलनेत रेडग्लोब, क्रीमसन या रेड व्हरायटीमध्ये टिकाऊ क्षमता जास्त आहे.
- अनिल मेहेर, अध्यक्ष : कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव
तालुक्यातील द्राक्ष तोडणीचा हंगाम मार्चअखेर पूर्ण होईल. वातावरणाच्या बदलानुसार जम्बो, शरद सीडलेस, द्राक्षामध्ये क्रॅकिंगची समस्या वाढली आहे. या मुळे शेतकऱ्यांनी जम्बो द्राक्षाच्या बागा कमी करून यावर्षी प्रतिकूल हवामानात तग धरणाऱ्या आरा रेड सिलेक्शन, रेडग्लोब, क्रीमसन या रेड जातीच्या द्राक्षाची लागवड केली आहे.
- हरिभाऊ वायकर, जम्बो द्राक्ष उत्पादक
06326, 06324
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

