कुणी डॉक्टर देता का डॉक्टर?
नारायणगाव, ता. ३ : येथील पुणे- नाशिक महामार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पद मागील आठ महिन्यापासून रिक्त आहे. मंजूर तीन वैद्यकीय अधिकारी यांच्यापैकी दोन वैद्यकीय अधिकारी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे येथील रुग्णांवर कुणी डॉक्टर देता का डॉक्टर? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
तीस बेडची क्षमता असलेल्या व रोज सुमारे १५० बाह्यरुग्ण तपासणीसाठी येत असलेल्या रुग्णालयात एकच महिला वैद्यकीय अधिकारी नेमणुकीस आहे. त्यांच्यावरच वैद्यकीय अधीक्षकासह रुग्ण तपासणी, शवविच्छेदन करणे, गरोदर मातांची तपासणी, अपघातग्रस्तांवर उपचार आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे वारंवार मागणी करूनही डॉक्टर उपलब्ध करून दिले जात नाहीत. या बाबत ग्रामस्थ व रुग्णांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
या रुग्णालयाला ३० खाटांवरुन १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली असून, उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाच्या वतीने १०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पाडण्यात आली असून, त्या ठिकाणी नवीन उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे काम सुरू आहे. यामुळे एप्रिलपासून रुग्णालयाचे स्थलांतर निवासी डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी पूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीत केले आहे.
रुग्णालयासाठी एक वैद्यकीय अधिक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सात अधिपरीचारीका, सहा शिपाई, कर्मचारी आदी २४ पदे मंजूर आहेत. सद्यःस्थितीत रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, तीन शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व ऑफिस सुप्रीडंट ही सहा पदे रिक्त आहेत. नेमणूक केलेल्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. अशोक माठे (भूलतज्ञ) हे ऑक्टोबरपासून, तर डॉ. तेजस वाळके (बालरोगतज्ञ) मागील एक महिन्यापासून रजेवर आहेत. सध्या रुग्णालयाचा कारभार डॉ. दीप्ती कळंबकर या एकमेव वैद्यकीय अधिकारी पाहत आहेत. पुरेशी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी
शवविच्छेदनासाठी पाच ते सहा तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शस्त्रक्रिया व अति दक्षता विभाग बंद असल्याने सर्पदंश, विषबाधा, अपघातग्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. पावसाळा सुरू झाल्याने सध्या डेंगू, ताप व इतर साथीचे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयात तातडीने डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कामावर हजर न राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीस काढण्यात आल्या आहेत. मंत्रालयातून भरती प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर ११ महिन्याच्या करारावर नारायणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी दोन डॉक्टर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप जास्त असल्याने डॉक्टर रुजू होण्यास तयार नाहीत. सध्या असलेल्या वैद्यकीय अधिकारी सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
- नागनाथ येमल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.