गहाळ साहित्य मिळाल्याने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर हसू
नारायणगाव, ता. ११ : गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची प्रवासादरम्यान एसटीमध्ये गहाळ झालेली शालेय खेळाची व इतर प्रमाणपत्र असलेली पिशवी शिक्षक व नारायणगाव आगाराचे वाहतूक निरीक्षक शुभम खरमाळे यांच्या तत्परतेमुळे परत मिळाली. यामुळे तणावात असलेल्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
विघ्नहर सहकारी साखर कारखाना फाटा येथे राहत असलेली समृद्धी रमेश पुजारी ही विद्यार्थिनी रोज सबनीस विद्यामंदिरात एसटीने ये-जा करते. शाळेत छात्रसेनेचा कॅम्प असल्याने शालेय खेळाचे साहित्य व इतर प्रमाणपत्र, पदके आणि जिंकलेले चषक घेऊन ती शाळेत आली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथून सुटणाऱ्या ओझर-नारायणगाव बसमध्ये ती या साहित्याची पिशवी विसरली. समृद्धी घरी गेल्यानंतर एसटीत पिशवी विसरल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती रडू लागली. पालक रमेश पुजारी यांनी याबाबतची माहिती शाळेच्या पर्यवेक्षिका अनुपमा पाटे यांना दिली. पाटे यांनी वाहतूक निरीक्षक शुभम खरमाळे यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर खरमाळे यांनी संबंधित एसटी चालक व वाहक यांच्याशी संपर्क साधून बसची तपासणी करण्यास सांगितले. वाहक पुष्पा डाके यांना ही पिशवी आढळून आली. त्यांनी ती पिशवी नारायणगाव आगारात जमा केली. ही पिशवी आणि त्यातील साहित्य पुन्हा परत मिळाल्याने समृद्धीने आनंद व्यक्त केला.