सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
नारायणगाव, ता. २७ : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून याबाबतची माहिती देणाऱ्या व फोटो पाठविणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावून संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचा गांधीगिरी मार्गाने सत्कार करण्यात येईल. वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन आदींची पूर्तता न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पाची नोंदणी केली जाणार नाही, असा ठराव नारायणगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत एकमताने संमत केला.
नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शुभदा वाव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत वीज, पाणी, रस्ते, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, अंगणवाडी सेविका, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आदी विषयांवर चर्चा केली.
यावेळी उपसरपंच योगेश पाटे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, उपसरपंच योगेश पाटे, सदस्य अरिफ आतार, सविता पाटे, संतोष दांगट, भावना बेल्हेकर, ज्योती कुतळ, भागेश्वर डेरे, अश्विनी गभाले, सुचिता क्षीरसागर, छाया बिरमल, हेमंत कोल्हे, सुप्रिया अडसरे, शारदा बाळसराफ, जालिंदर खैरे, गणेश पाटे, प्रिया खैरे, जुबेर आतार आदी उपस्थित होते.
विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन ग्रामविकास अधिकारी उंडे यांनी केले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन सरपंच डॉ. वाव्हळ, उपसरपंच पाटे यांनी केले. सुरक्षिततेसाठी गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसवण्यात यावेत. सर्व घरे, सोसायटी यांना सोलर सिस्टिम बसविण्यासाठी उपाययोजना करण्याचे यावेळी ठरविले. आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांसाठी भैरवनाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बसण्याची व्यवस्था करावी, कालव्यालगतच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी केली. यापुढे बांधकाम प्रकल्प उभारताना वृक्षारोपण, सांडपाण्याचे शुद्धीकरण, एसटीपी प्लांट सुविधा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण आदी सुविधा कराव्यात, अन्यथा या प्रकल्पाची नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी होणार नाही, असा ठराव यावेळी संमत केला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे, सुरेश वाणी, संतोष वाजगे, नीलेश गोरडे, विकास तोडकरी, अजित वाजगे, सचिन विटे, भगवान कोऱ्हाळे, दीपक डेरे, जितेंद्र भोर, नंदू अडसरे आदींनी भाग घेतला. प्रास्ताविक सदस्य गणेश पाटे यांनी केले. हेमंत कोल्हे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.