गतिरोधकांची झीज झाल्याने वाहने सुसाट
नारायणगाव, ता. ८ : पुणे- नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावरील गडाचीवाडीकडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार केलेले गतिरोधक नादुरुस्त झाले आहेत. गतिरोधकाची झीज होऊन उंची कमी झाल्याने पुणे व नाशिककडे ये- जा करणारी वाहने वेगात जात आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गतिरोधकाची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील बाह्यवळण रस्त्याला गडाचीवाडी व पाटे खैरेमळा शिवाराकडे जाणारा रस्ता जोडतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायती शेतजमीन व महामार्गालगत हॉटेलसह अन्य व्यावसायिक दुकाने आहेत. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, खते, शेतमाल घेऊन या चौकातून ये- जा करावी लागते. या चौकात बाह्यवळण रस्त्यावर पुलाची उभारणी करावी. या मागणीसाठी येथील नामदेव खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.
मात्र, बाह्यवळण रस्त्यावरील खोडदकडे जाणाऱ्या चौकात उड्डाणपूल झाल्याने गडाचीवाडी चौकात पुलाला मंजुरी मिळाली नाही. अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने येथील चौकाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसवले. मात्र, अवजड वाहनांची ये- जा जास्त असल्यामुळे सद्यःस्थितीत झीज झाल्याने गतिरोधकांची उंची कमी झाली आहे. यामुळे वाहने गतिरोधकावरून वेगाने जात आहेत. वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी गतिरोधकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
07306