जुन्नरला अतिवृष्टीचा साडेचार कोटींचा फटका
नारायणगाव, ता.२९ : अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील खरीप हंगामातील तृणधान्य, भाजीपाला व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाने केले आहेत. अहवालानुसार तालुक्यातील पाच हजार ५०६ शेतकऱ्यांचे एकूण तीन हजार ४११ हेक्टर क्षेत्रातील भात, तृणधान्य, भाजीपाला पिके, सोयाबीन, पेरू केळी व द्राक्ष या पिकांचे एकूण चार कोटी ५१ लाख ९१ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील पंचनाम्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली. जुन्नर तालुक्यात मे महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर सातत्याने पाऊस सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तृणधान्य,सोयाबीन, भात, भाजीपाला पिके व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे घड निर्मिती न झाल्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष या वार्षिक नगदी पिकांचे झाले आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे दोन टप्प्यात केले आहेत. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात भात, सोयाबीन, तृणधान्य, भाजीपाला व फूल पिके, केळी, पेरू या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. कृषी विभागाच्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात चार हजार १४० शेतकऱ्यांचे दोन हजार २९४ .९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे दोन कोटी ७५ हजार ९७५ रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन (एक हजार ४१५ हेक्टर) व भात (७५३.३५ हेक्टर) पिकांचे झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ (एन.आर.सी.जी.) यांच्या अहवालानुसार दुसऱ्या टप्प्यात द्राक्ष पिकांचे पंचनामे नुकतेच करण्यात आले आहेत. त्यानुसार तालुक्यातील एक हजार ३६६ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे १ हजार ११६.२५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष पिकांचे दोन कोटी ५१ लाख १५ हजार ६२५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
२७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार बाधित पिकांना दिलेले हेक्टरी अनुदान (रुपयांत)
जिराईत पिके............८ हजार ५०० (एकरी ३ हजार ४०० रुपये)
भाजीपाला पिके............१७ हजार ( एकरी ६ हजार ८०० रुपये)
फळपिके............२२ हजार ५०० ( एकरी नऊ हजार रुपये)
पहिल्या टप्प्यात केलेल्या पंचनाम्यानुसार दोन हजार २९४ .९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे दोन कोटी ७५ हजार ९७५ रुपयांचे नुकसान झाले होते. त्यापैकी शासनाकडून अनुदानाची एक कोटी ८० लाख रुपयाची रक्कम उपलब्ध झाली आहे. या अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. द्राक्ष पिकासह उर्वरित अनुदान पुढच्या टप्प्यात जमा होईल. शासन निर्णयानुसार एका शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत दिला जातो.
- गणेश भोसले, जुन्नर तालुका कृषी अधिकारी
अनुदान तुटपुंजे
वाढलेला वाढलेला भांडवली खर्च पाहता अनुदानाची रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. जिरायती पिकांना एकरी २५ ते ३० हजार रुपये, भाजीपाला पिकांना एकरी एक लाख रुपये, द्राक्ष पिकाला एकरी तीन लाख रुपये खर्च येतो.शासन निर्णयानुसार जिरायती पिकांना एकरी ३ हजार ५०० रुपये, भाजीपाला पिकांना ६ हजार ८०० रुपये, द्राक्ष पिकासह इतर फळ पिकांना ९ हजार रुपये अनुदान दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

