अन्यथा, आंबा पिकाचे ८० टक्के नुकसान
नारायणगाव, ता. ३० : जुन्नर तालुक्यात आंबा पिकाखाली ६५० हेक्टर क्षेत्र आहे. गावरान आंब्यांच्या जागी कलमी आंब्यांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. आंब्यांना नुकताच मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. कीड व रोग नियंत्रणाची काळजी न घेतल्यास आंबा पिकाचे ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. आंब्याची उत्पादकता व गुणवत्ता ही मोहोरावरील कीड व रोग यांच्या नियंत्रणावर अवलंबून असते. यामुळे वेळीच कीड नियंत्रण करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांनी आंबा उत्पादकांना केले आहे.
प्रामुख्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील येणेरे, आपटाळे, कुसूर, वडज, गोळेगाव, निमगिरी या भागात हापूस, केशर आंब्याच्या बागा आहेत. तालुक्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकऱ्यांनी घराजवळ व शेताच्या बांधांवर मोठ्या प्रमाणात कलमी आंब्याची लागवड केलेली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या तालुक्यातील हापूस आंब्याला शिवनेरी मानांकन मिळाले आहे. साधारणपणे जून महिन्यात उशिरा सुरू होणाऱ्या तालुक्यातील हापूस आंब्याने मुंबई बाजारपेठ काबीज केली आहे.
१७६ जगात किडींची नोंद
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे म्हणाले, आंबा पिकावर १७६ प्रकारच्या विविध किडींची नोंद आहे. आंबा मोहारावर प्रामुख्याने तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी, पिठ्या ढेकूण, कोयातील भुंगा, भिरूड, पाने गुंडाळणारी अळी, खवले कीड, पानांवर फोड करणारी मिजमाशी, कोळी, फुलकिडे आणि फळमाशी यांसारख्या किडींचा व भुरी, करपा या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. महाराष्ट्रात आंबा पिकावर प्रामुख्याने तुडतुडे, फळमाशी, खोडकिडा, शेंडा पोखरणारी अळी, मिजमाशी, पिठ्या ढेकूण या किडीचा व भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
मधमाशांची काळजी घ्या
मधमाशामुळे परागीभवन होत असल्याने मधमाशांना अपाय होऊ नये. त्या दृष्टीने फवारणीचे नियोजन करणे आवश्यक असते. पिकावरील कीड व रोग नियंत्रण मोहोर पूर्व, फुलोरा व फळधारणा या तीन टप्प्यात करावे लागते. मोहोर निघण्याच्या अवस्थेत किंवा त्यापूर्वी कीटक व बुरशी नाशकांची फवारणी करावी. मात्र त्यानंतर मधमाशांना अपाय होऊ नये म्हणून फुलोरा अवस्थेत जैविक पद्धतीने मोहोर संरक्षण करावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी दिला आहे.
मावा/फुलकिड नियंत्रण
निंबोळी अर्क पाच मिली प्रतिलिटर किंवा २.५ मिली स्पिनोसॅड ४५ टक्के एस.सी., १० लिटर पाण्यात अथवा २ ग्रॅम थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू.जी. १० लिटर पाण्यात दोन ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. जैविक कीड नियंत्रणासाठी बागेमध्ये निळे चिकट सापळे लावावेत. त्यामुळे फुलकिडे नियंत्रण प्रभावीपणे होते.
भुरी व करपा रोग व्यवस्थापन: कोर्बेडझीयम १२% + मॅनकोझेब ६३% डब्ल्यू.पी. (०.१ %) किंवा थायोफिनेट मिथाईल (०.१ %) किंवा प्रोपीनेब (०.२ %) यांपैकी एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.आंबा झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड (२.५ ग्रॅम /लिटर पाण्यात) किंवा १% बोर्डोमिश्रण किंवा ०.१ % कार्बेडिझीयम यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
जैविक पद्धतीने फळमाशीचे करा नियंत्रण
आंबा फळे लिंबाच्या आकाराची झाल्यानंतर फळावर फळमाशी दंश करते. मागील काही वर्षात फळ माशीचे प्रमाण वाढले आहे.यामुळे आंबा फळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी आंबा बागेत पिवळ्या रंगाचे बल्बच्या आकाराचे फळमाशी सापळे लावावेत.
07656
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

