नारायणगावात दोन अपघातात महिलेस दोघांचा मृत्यू

नारायणगावात दोन अपघातात महिलेस दोघांचा मृत्यू

Published on

नारायणगाव, ता. १: पुणे-नाशिक महामार्ग व नारायणगाव -ओझर रस्त्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका विवाहित पादचारी महिलेसह तरुणाचा मृत्यू झाला. तर एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली. हे दोन्ही अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाले आहेत. यामुळे चूक नसताना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन जणांचा नाहक मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात दोन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशा नामदेव शेळके (वय ४७ रा. धनगरवाडी, ता. जुन्नर), धनंजय अशोक कोकणे (वय ४२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. तर कौसल्या भागूजी बेनके (वय ४५ रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
आशा शेळके व कौसल्या बेनके या मैत्रिणी सकाळी साडेसहाच्या सुमारास नारायणगाव -ओझर रस्त्याच्या कडेने धनगरवाडी येथून नारायणगावच्या दिशेने मॉर्निंग वॉक करत निघाल्या होत्या. दरम्यान, भरधाव वेगाने, ट्रॅक्टरमधील साउंड सिस्टीमचा आवाज मोठ्याने करून नारायणगावच्या दिशेने निघालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीने दोघींना मागून धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून आशा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर कौसल्या बेनके या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील भोसले हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टरसह फरार झाला. याप्रकरणी विनोद एकनाथ शेळके यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशा शेळके यांच्या मागे पती, रायगड येथे कार्यरत असलेल्या मोटार वाहतूक निरीक्षक कन्या श्वेता, कृषी साहाय्यक मुलगा सत्यवान असा परिवार आहे.
दुसरा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर कांदळी फाटा येथील पुलाजवळ झाला. धनंजय कोकणे हे बुधवारी (ता. ३१) रात्री अकराच्या सुमारास मोटर सायकलवर नारायणगावच्या दिशेने येत होते. दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने मोटर सायकलला मागून धडक दिली. या अपघातात कोकणे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोटर चालक मंगेश शांताराम इंदोरे (वय ४१ रा. अवसरी ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंगेश इंदोरे हा मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस उप निरीक्षक जगदेव पाटील यांनी दिली. याप्रकरणी धीरज अशोक कोकणे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. धनंजय कोकणे यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, भाऊ आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी येथील मीना नदी काठावर धनंजय कोकणे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ग्रामस्थांचा रास्ता रोको
अपघातात आशा शेळके यांचा मृत्यू झाल्यानंतर धनगरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच महेश शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नारायणगाव ओझर रस्त्यावर धनगरवाडी येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर ट्रॉली वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.मागील आठवड्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक बसून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या घटना वारंवार घडत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व माल ट्रकवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सरपंच महेश शेळके यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com