ऊस वाहतुकीची धोकादायक वाहतूक

ऊस वाहतुकीची धोकादायक वाहतूक

Published on

नारायणगाव, ता. १ : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रक व ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉल्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरून असुरक्षित केली जाणारी उसाची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. त्या मध्ये नादुरुस्त रस्त्यांची भर पडली आहे. ही जीवघेणी बेकायदा ऊस वाहतूक थांबणार तरी कधी? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नारायणगाव-ओझर रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून मनीषा तानाजी भोर (वय ४५ रा. हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धनगरवाडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली सापडून दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली होती. या घटना ताज्या असतानाच गुरुवारी (ता. १) आशा शेळके यांचा मृत्यू झाल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सध्या जुन्नर तालुक्यातील विविध रस्त्यावरून विघ्नहर व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे नियमांचे उल्लंघन करून ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉल्यांद्वारे अतिशय धोकादायक पद्धतीने प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जाते. काही ट्रॅक्टरच्या हेडलाईट नादुरुस्त असतात, ट्रॉल्यांना रिफ्लेक्टर बसवलेले नसतात, ट्रॅक्टर चालवण्याचे काम अल्पवयीन मुले करतात, चालकाकडे वाहतूक परवाना आहे किंवा नाही याची खात्री केली जात नाही. ट्रॅक्टरची देखभाल केलेली नसल्याने ब्रेक दाबला तरी वाहने थांबत नाहीत. बहुतेक ट्रॅक्टरमध्ये साउंड सिस्टिम द्वारे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. काही ट्रॅक्टर चालक मद्यपान करून किंवा गुटखा चघळत वाहन चालवतात. याकडे पुणे येथील क्षेत्रीय परिवहन कार्यालयाचे अधिकारी का दुर्लक्ष करतात हा प्रश्न निर्माण होत आहे. कारखाना प्रशासन सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत नाही. यामुळे माणसाचा जीव स्वस्त झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे येथील क्षेत्रीय परिवहन विभागाचे मोटार वाहतूक निरीक्षक यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी करावी. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे का, चालकाकडे वाहन परवाना आहे का, वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट आहे का, ऊस वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन होत आहे का, एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडण्याची परवानगी आहे का? आदींची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
- महेश शेळके, सरपंच, धनगरवाडी (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com