अपघातानंतर फरार ट्रॅक्टरचालकास अटक

अपघातानंतर फरार ट्रॅक्टरचालकास अटक

Published on

नारायणगाव, ता. २: मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या धनगरवाडी येथील दोन महिलांना धडक देऊन फरार झालेल्या व एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरचालकास नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला १८ वर्षीय ट्रॅक्टर चालक निरक्षर असून त्याच्याकडे वाहनचालक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती नारायणगावचे पोलिस उपनिरीक्षक जगदेव पाटील यांनी दिली.
आकाश कैलास राठोड (वय १८, सध्या रा. विघ्नहर सहकारी साखर कारखाना, मूळ रा. धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नारायणगाव-ओझर रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या धनगरवाडी येथील आशा नामदेव शेळके (वय ४७) व कौसल्या भागूजी बेनके (वय ४५) या महिलांना गुरुवारी (ता. १) सकाळी साडेसहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसली. या अपघातात आशा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर कौसल्या बेनके या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉल्या घेऊन चालक पसार झाला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मयूर शेळके, सरपंच महेश शेळके, ग्रामस्थ रोहन शेळके, विनोद शेळके यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अपघातानंतर फरार झालेला चालक आकाशला टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन त्याला नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून केली जाणारी प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक चव्हाट्यावर आली आहे. यामुळे मागील १५ दिवसांत दोन महिलांना नाहक जीव गमवावा लागला आहे. आता तरी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने हा विषय गांभीर्याने घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

स्वप्न राहिले अपूर्ण
अल्पभूधारक असलेल्या आशा शेळके यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, काबाड कष्ट करून मुलगी श्वेता हिला अभियांत्रिकीचे तर मुलगा सत्यवान याला कृषी पदवीधर केले. दोन्हीही मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. या पैकी श्वेता ही रायगड येथे मोटार वाहतूक निरीक्षक ( आरटीओ) असून सत्यवान हे श्रीवर्धन येथे कृषी साहाय्यक आहेत. अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या दोन्ही मुलांचे लग्न करून भविष्यकाळात सुखी जीवनाची स्वप्न पाहणाऱ्या आशा शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक परवाना नसताना ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून सुमारे १२ टन उसाची वाहतूक केली जाते. अपघाताची घटना घडल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची तपासणी केली असता उसाची वाहतूक करणाऱ्या आठ चालकांकडे वाहन चालक परवाना नसल्याचे दिसून आले. हा सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ आहे. याकडे संबंधित विभागाचे का दुर्लक्ष होत आहे.असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- मयूर शेळके, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती


ट्रॅक्टर चालक व चालक परवाना नसताना ट्रॅक्टर देणारा मुकादम हे आशा शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत. कारखाना प्रशासन त्यांना पाठीशी घालणार नाही. उपाययोजना करण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. २) सकाळी विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक झाली. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टरमधील साउंड सिस्टिम काढून टाकण्यात आली आहे. ऊस तोडणी व वाहतूक करणारे मुकादम व ठेकेदार यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
- संतोष खैरे, संचालक, विघ्नहर सहकारी साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com