वीस गुंठ्यात एकात्मिक शेती मॉडेल
नारायणगाव, ता. ४ : कृषी विज्ञान केंद्रात ८ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान ग्लोबल कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रातील २० गुंठ्यात उभारलेला हा पोषणमूल्य आधारित एकात्मिक शेती मॉडेल प्रकल्प पाहण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. २० गुंठ्यापैकी दहा गुंठ्यात पौष्टिक तृणधान्य मिलेट उत्पादन घेतले आहे. तर उर्वरित दहा गुंठ्यात ४८ प्रकारची फळ,भाजीपाला, मायक्रोग्रीन्सची उत्पादने घेतली आहेत.
अन्नधान्य व फळ, भाजीपाला पिकांसाठी वापरली जाणारी कीटकनाशके, रासायनिक खते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत.यामुळे किडनियंत्रणासाठी चिकट सापळे, शेणखत व गांडूळ खते आदींचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने, उत्पादित केलेली विषरहित शेती उत्पादनाचे महत्त्व मानवी आरोग्याच्या दृष्टीने अधोरेखित झाले आहे. पोषणमूल्य असलेली शुद्ध शेती उत्पादने प्रत्येक कुटुंबाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रात कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली गृहविज्ञान विषयतज्ञ निवेदिता शेटे यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक पद्धतीने वीस गुंठ्यात उभारलेला ४८ प्रकारचा फळ,भाजीपाला, तृणधान्य, मिलेट, मायक्रोग्रीन्स आदीचा उत्पादन प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे.
डब्ल्यू. एच.ओ. व एन.आय. एन.च्या आहार शास्त्रज्ञांच्या मते रोजच्या आहारात विविध वर्गीय भाजीपाला तसेच १०० ग्रॅम फळे ही प्रति व्यक्ती पोषण मूल्यांची गरज भागवण्यासाठी गरजेची आहेत. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील गृह विज्ञान विभागाच्या वतीने शास्त्रीय पद्धतीने २० गुंठ्यांमध्ये एका कुटुंबासाठी लागणारे धान्य तसेच सर्व भाजीपाला घरच्या घरी मिळेल यासाठी वर्षभराचे कॅलेंडर तयार केले आहे. मिलेट उद्यानामध्ये मध्ये दहा प्रकारच्या मिलेट व जैवसंपुष्ट वाणाचे (बायो फोर्टीफाईड) उत्पादन घेतले आहे. शहरवासीयांसाठी सुद्धा टेरेस गार्डन, मातीविना शेती तसेच बाल्कनी गार्डन अशी प्रात्यक्षिके उभारली आहेत. ज्यांना शेती, टेरेस नाही अशा कुटुंबासाठी मायक्रोग्रीन्स याचेही प्रात्यक्षिक सादर केले आहे.
मायक्रोग्रीन्स म्हणजे काय
कमी वेळेत उगवणाऱ्या जास्त पौष्टिक आणि चवदार कोवळ्या पालेभाज्यांचा एक प्रकार आहे.यामध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते. रोपांच्या वाढीच्या वेळेस ती कापली जातात आणि खाण्यासाठी वापरतात. भाज्या,धान्य आणि औषधी वनस्पती अशा प्रकारापासून मायक्रोग्रिन्स बनवले जाते. उदा.मेथी,मुळा,मोहरी, ब्रोकोली आदींचे बी टाकल्यानंतर साधारण सात ते दहा दिवसात येणारी कोवळी पौष्टिक पाने आपण खाद्य म्हणून वापरू शकतो.या मायक्रो ग्रीन्स च्या माध्यमातून विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात,पचनशक्ती सुधारते
मिलेटचे विविध प्रकार :
पारंपारिक परंतु लुप्त होत चाललेली मिलेट अधिक पोषणमूल्य व फायबर युक्त आहेत. दैनंदिन आहारामध्ये त्याचा समावेश करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मिलेट उद्यानामध्ये ब्राऊन टॉप, राळे, प्रोसो मिलेट, लिटिल मिलेट, नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा आदि तृणधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे.
कुटुंबाला आर्थिक उत्पन्न
केव्हीकेच्या उद्यानात या वर्षी एक गुंठ्याऐवजी चार गुंठा जागेत मार्केट पोषण उद्यान ही संकल्पना सुद्धा राबवली आहे. यामुळे पाच व्यक्ती असलेल्या एका कुटुंबाची फळ भाजीपाल्याची गरज भागवून उर्वरित भाजीपाल्याची विक्री करून मासिक सहा रुपये उत्पन्न मिळेल. आपल्या परिसरातील नागरिकांना नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेला भाजीपाला उपलब्ध होईल. हा विचार करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबाची गरज भागवून व आर्थिक उत्पन्नासाठी काही विक्री करता यावीत.या उद्देशाने विषमुक्त व सर्वाधिक पोषणमूल्य असलेले कडधान्य,पालेभाज्या, फळभाज्या विविध सिजनल फळे उपलब्ध व्हावीत. या साठी मार्केट पोषण उद्यान ही संकल्पना राबवली आहे.विष मुक्त भाजीपाला हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
- निवेदिता शेटे, गृह विज्ञान विषयतज्ज्ञ, केव्हीके
07692, 07693
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

