नारायणगाव- वारूळवाडी गटातील इच्छुकांचा जीव टांगणीला

नारायणगाव- वारूळवाडी गटातील इच्छुकांचा जीव टांगणीला

Published on

नारायणगाव, ता. १८ : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव- वारूळवाडी जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवारांची नावे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीर केली आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. लवकर उमेदवारी यादी जाहीर करा, अशी मागणी या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी नेत्यांकडे केली आहे.
जाहीर झालेल्या आरक्षणांनुसार नारायणगाव- वारूळवाडी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नारायणगाव गण अनुसूचित जाती महिला, वारूळवाडी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या गटातून नेहा योगेश पाटे, नारायणगाव गणातून सुषमा अर्जुन वाव्हळ, वारूळवाडी गणातून जयश्री दिलीप बनकर यांची उमेदवारी आमदार सोनवणे यांनी जाहीर करून आघाडी घेतली आहे. मात्र, इतर पक्षांनी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. याबाबत माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, ‘‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर केली जाईल.’’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाबरोबर युती करायची किंवा काय याबाबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात यादी जाहीर केली जाईल.’’ ‘‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पुणे येथे बैठक आहे. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर भाजपचे उमेदवार निश्चित केले जातील,’ अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे यांनी दिली.
उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यास प्रचाराला कमी वेळ मिळेल, पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी उमेदवारी यादी लवकर जाहीर करा, अशी मागणी या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. मात्र आघाडी युतीबाबतचा घोळ सुरू असल्याने उमेदवारी यादी जाहीर करण्यास उशीर होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
नारायणगाव गटात नारायणगाव, वारूळवाडी, धनगरवाडी, गुंजाळवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव, मांजरवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण मतदार संख्या ३७ हजार १८५ आहे. यापैकी नारायणगाव, वारूळवाडी या मोठ्या ग्रामपंचायतमधील एकूण मतदार संख्या २७ हजार ३५१ आहे. उर्वरित गावांची एकूण मतदार संख्या ९ हजार ८३४ आहे. यामुळे नेत्यांचे लक्ष नारायणगाव व वारूळवाडी या दोन गावातील मतदारांकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com