

नारायणगाव, ता. २८: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूमुळे जुन्नर तालुक्यातील व्यावसायिकांनी आज उस्फूर्तपणे बंद पाळला. श्रद्धांजली कार्यक्रम घेऊन शाळा, ग्रामपंचायत कार्यालयांचे कामकाज बंद करण्यात आले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे सर्व कार्यक्रम सर्वपक्षीय नेत्यांनी रद्द केले.
अपघाताचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते माजी आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी जमा झाले. माजी आमदार बेनके यांच्या निवासस्थानी शोकसभा झाली. शेतकऱ्यांचा नेता, हक्काचा माणूस हरपला, दादा आम्ही पोरके झालो. अशी भावना यावेळी व्यक्त होत होती. अमर रहे, अमर रहे अजित पवार अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी माजी आमदार बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, ज्येष्ठ नेते गुलाबराव नेहरकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी सभापती बाजीराव ढोले, विकास दरेकर,विलास पाटे, अनघा घोडके आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन हंबरडा फोडला.
बिबट समस्येवर योगदान
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारानिमित्त आले होते. तालुक्याचा हा त्यांचा शेवटचा दौरा ठरला. शिवनेर परिसर विकास, कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन, बिबट समस्या, तालुक्यातील विविध विकास कामे यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे. स्थानिक अडचणी विकास कामा संदर्भात सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा थेट उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संवाद साधत होते.
जुन्नर तालुक्यात हळहळ
स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या राजकीय वाटचालीपासून बेनके कुटुंबाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. हीच वाटचाल माजी आमदार बेनके यांनी पुढे सुरू ठेवली होती. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अचानक जाण्याने जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या उपस्थितीत शोकसभा घेण्यात आली. नारायणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
07795, 07794
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.