वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे वारूळवाडीत अग्नितांडव
नारायणगाव, ता. १७ : वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील महावितरण प्रक्षेत्रात मंगळवारी (ता. १७ ) दुपारी तीनच्या सुमारास ३३ केव्ही क्षमतेच्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे भीषण आग लागली. जुन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने महावितरणचे मोठे नुकसान टळले.
वारूळवाडी येथील पुणे-नाशिक महामार्गालगत पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या या कार्यालयातून जुन्नर, नारायणगाव, सावरगाव,आर्वी, हिवरे तर्फे नारायणगाव,मांजरवाडी, खोडद, ओतूर ( ता. जुन्नर) , घोडेगाव (ता. आंबेगाव) आदी भागात वीज पुरवठा केला जातो. दुपारी तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून खालील वाळलेल्या गवताने पेट घेतला. यामुळे आग झपाट्याने परिसरात पसरली. झाडाच्या फांद्यांचा वापर करून महावितरणचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, नारायणगावचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, शाखा अभियंता बिराजदार यांनी जुन्नर नगरपरिषद व नारायणगाव ग्रामपंचायतीशी संपर्क साधला.
हवालदार दत्ता ढेंबरे, मंगेश लोखंडे, आपदा मित्र सुशांत भुजबळ, आदित्य डेरे, शंतनू डेरे, संतोष रोकडे यांनी आग पसरू नये म्हणून प्रयत्न केले. चारच्या सुमारास जुन्नर येथील अग्निशमन यंत्रणा व नारायणगाव ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाचे संतोष रोकडे, चंद्रकांत साबळे, महेश गारगुंड यांनी पाण्याचा फवारा मारून साडेचारच्या सुमारास आग आटोक्यात आणली
अग्निशमन उपकरणच नाही
मागील वर्षी २६ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून आग लागली होती. आज आगीची पुनरावृत्ती झाली. वारंवार अशा घटना घडत असतानाही महावितरण कार्यालयात अग्निशमन उपकरणे नसल्याचे समोर आले आहे. याबाबत लवकरच सिलिंडर खरेदी करू, असे आश्वासन अभियंता बिराजदार यांनी दिले.
7899

