जुन्नरमधील द्राक्ष उत्पादकांना १०० कोटींचा फटका

जुन्नरमधील द्राक्ष उत्पादकांना १०० कोटींचा फटका

Published on

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. ४ : अतिवृष्टी व प्रतिकूल हवामानामुळे सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना अपेक्षित घड निर्मिती न झाल्याने यंदाचे वर्ष जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना आर्थिक अडचणीचे ठरले आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.तालुक्यातील द्राक्ष तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

द्राक्ष निर्यात व देशांतर्गत बाजारपेठेतील स्थानिक विक्रीतून यंदा जेमतेम यावर्षी पस्तीस कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील ४० वर्षात प्रथमच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हंगाम वाया गेला आहे. निर्यातक्षम जम्बो जातीच्या द्राक्ष उत्पादनात जुन्नर तालुका राज्यात अग्रेसर समजला जातो. जम्बो, शरद सीडलेस, फ्लेम, क्रिमसन, किंग बेरी, सुपर सोनाका, थॉमसन सीडलेस आदी जातीच्या द्राक्षाचे उत्पादन तालुक्यात घेतले जाते. यापैकी सर्वाधिक जम्बो द्राक्ष उत्पादन घेतले जाते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी स्व. भालचंद्र बनकर, अनिल मेहेर, प्रकाश पाटे यांनी तालुक्यात द्राक्ष लागवडीची प्रयोग केला. ही परंपरा पुढे सुरू आहे.


तालुक्यात मे २०२५ मध्ये ३४० मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर सूर्यप्रकाशाचा अभाव राहिला. यामुळे या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर छाटणीनंतर जवळपास ८० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मितीच झाली नाही. परिणामी सुमारे एक हजार एकर क्षेत्रातील प्रामुख्याने जम्बो जातीच्या द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली. प्रतिकूल हवामानात तग धरणाऱ्या आरा ३५, आरा ३६ या पेटंट व्हरायटी लावण्याचा निर्णय बहुतेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

द्राक्षाची अडीच हजार टन निर्यात
द्राक्ष बागायतदार व निर्यातदार यांच्याकडून आढावा घेतला असता या वर्षी जेमतेम अडीच हजार टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. यावर्षी बाजार भाव प्रतिकिलोग्राम शंभर रुपये ते १७० रुपयांच्या दरम्यान मिळाला. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाला वाढीव बाजारभाव मिळाल्याने ३३ कोटी रुपयांचे आर्थिक उलाढाल झाली आहे.

व्यवसायिकांनासुद्धा पंचवीस कोटींचा फटका
द्राक्ष शेतीच्या माध्यमातून तालुक्यातील व्यापार वाढला आहे. हजारो कामगारांना रोजगार मिळाला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने रासायनिक खते, औषधे, शेणखत, वाहतूकदार, फवारणीची अवजारे, ट्रॅक्टर, प्लॅस्टिक ट्रे, रद्दी, पॅकिंग साहित्य आदीच्या खरेदीवर परिणाम झाल्याने व्यवसायिकांनासुद्धा सुमारे वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

प्रतिकूल हवामानात तग धरणाऱ्या पेटंट व्हरायटी लावण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सुद्धा प्रायोगिक आहे. पेटंट व्हरायटी लावण्यासाठी एकरी पाच ते सहा लाख रुपयांचा प्राथमिक खर्च होत आहे. या व्हरायटीत अटी व शर्ती असल्याने हा निर्णय किती फायदेशीर ठरतो. याबाबत द्विधा अवस्था आहे, असे द्राक्ष बागायतदार गुलाबराव नेहरकर, प्रकाश वाघ यांनी सांगितले.

डीजे एक्सपोर्ट कंपनी मार्फत जुन्नर तालुक्यातून दरवर्षी सुमारे २५० कंटेनर (३२५० टन) निर्यात केली जातात. यावर्षी फेब्रुवारी अखेर तालुक्यातून केवळ सहा कंटेनर (७८ टन ) द्राक्षाची निर्यात झाली आहे.
- बिजू जोसेफ, डीजे एक्सपोर्ट कंपनी व्यवस्थापक


दरवर्षी द्राक्ष हंगामात (जानेवारी ते मार्च) तालुक्यातून दररोज ५० टन द्राक्ष बांगलादेशात निर्यात केली जात होती. फेब्रुवारी अखेर मागील वर्षी बांगलादेशात दोन हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. यावर्षी जेमतेम ५०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.
- रोहिदास घोलप, निर्यातदार एजंट

मार्च अखेर कर्ज भरण्याची चिंता
जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी पुणे जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटी, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँक मार्फत सुमारे पन्नास कोटी रुपयांचे पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे. द्राक्ष हंगामा अडचणीत आल्याने मार्च अखेर घेतलेले कर्ज व हप्ते भरण्याची चिंता द्राक्ष उत्पादकांमधून व्यक्त होत आहे. अतिवृष्टीमुळे या हंगामात तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती न झाल्याने द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत आहेत.


07945

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com