मीना शाखा कालव्याला झुडपांचा विळखा
नारायणगाव, ता. २३ : कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून शेती सिंचनासाठी मीना शाखा कालव्यात आवर्तन सोडले आहे. मात्र, नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कालव्याच्या लघु वितरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झाडेझुडपे वाढली असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे.
झुडपांमुळे शेती पिकांच्या सिंचनास ऐन उन्हाळ्यात अडथळा निर्माण झाला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने लघु वितरिकेमधील वाढलेली झाडे, कचरा काढून लघु वितरिकेची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नारायणगाव येथे मीना शाखा कालव्याच्या दक्षिण बाजूस सुमारे तीन किलोमीटर लांबीची व तीन मीटर रुंदीची लघु वितरिका आहे. या वितरिकेमधून नारायणगाव व हिवरेतर्फे नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मीना शाखा कालव्यातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडले जाते. मात्र, मागील अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्याने वितरिकेत बाभळीची मोठी झाडे व इतर झाडेझुडपे वाढली आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात संपर्क साधला असता निधी उपलब्ध नाही. पाणी वापर संस्थेने लघु वितरिकेची देखभाल करावी, अशी माहिती देण्यात आली.
पिकांच्या सिंचनात अडचण
कालव्यातून सोडलेले आवर्तन अतिशय संथ गतीने सुरू असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पिकांच्या सिंचनात अडचण झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कुकडी पाटबंधारे विभागाकडे यापूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कुकडी पाटबंधारे विभागाने जुजबी सफाई केली होती. मात्र, लघु वितरिकेमधील वाढलेली बाभळीची झाडे न काढल्याने मूळ समस्या जैसे थे आहे.
आंदोलन करण्याचा इशारा
कुकडी पाटबंधारे विभागाने लघु वितरिकेची सफाई करावी, शेतमाल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मीना शाखा कालवा व लघु वितरिका लगत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी आशिष वाजगे यांनी दिला आहे.
08016
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

