रोहित्र चोरणाऱ्यांची टोळी पकडण्यात यश
नारायणगाव, ता. २४ : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड या तालुक्यांतील विद्युत रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच जणांना अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले. आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने, चोरी केलेल्या १३७ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा, असा एकूण ८ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी भास्कर रंगनाथ केवळ (वय ३४, रा. पिराचीवाडी निमदरी, ता. जुन्नर), दीपक लहू भालेकर (वय ३०, रा. ढगाडवाडी, येणेरे ता. जुन्नर), सुखरूप सुखदेव नांगरे (वय २४, रा. हिवरेतर्फे नारायणगाव, ता. जुन्नर), राजेंद्र भालचंद्र भालेकर (वय ३३, रा. ढगाडवाडी), कृष्णा बबन जाधव (वय ३०, रा. मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, ता. शिरूर) या पाच तरुणांना अटक केली आहे.
मागील वर्षभरात जुन्नर,आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड तालुक्यात २३ रोहित्रांची चोरी झाली होती. रोहित्राच्या सातत्याने चोऱ्या होत आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपींवर स्थानिक पोलिस ठाण्यात रोहित्र चोरीचे २३ गुन्हे दाखल झाले होते. विद्युत रोहित्र चोरीच्या घटना दुर्गम व ग्रामीण भागात होत असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करण्यात स्थानिक पोलिसांपुढे अडचण निर्माण झाली होती.
चोरीचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर, खेड उपविभागात कामकाज पाहणारे अधिकारी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने मागील दोन महिने गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्यांची वेळ, कार्यपद्धती पडताळून घटनास्थळाकडे जा- ये करण्यासाठी वापरण्यात येणारे रस्ते, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील गुन्हेगार आदी माहितीचे संकलन केले. त्या आधारे १७ मार्च रोजी नारायणगाव पुणे- नाशिक बायपासजवळील मांजरवाडी रस्त्यावर संशयित आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण संपांगे, पोलीस अंमलदार, दीपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, नीलेश सुपेकर, राजू मोमीण, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांच्या पथकाने या चोरीचा छडा लावला. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास नारायणगाव व जुन्नर पोलिस करत आहेत.
तारा घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध
या चोरट्यांनी चौकशीत पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड तालुक्यातील तेवीस विद्युत रोहित्रांची चोरी केल्याची कबुली दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात या पूर्वी विद्युत रोहित्र व शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहित्राची चोरी केल्यानंतर त्यामधील तांब्याच्या तारांची कोणत्या व्यापाऱ्यांना विक्री केली जात होती. याचा शोध पोलिस घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

