बुध्यांत कचरा पेटविल्याने वड कोसळला

बुध्यांत कचरा पेटविल्याने वड कोसळला

नसरापूर, ता.२५ : नसरापूर-चेलाडी (ता. भोर) या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली वडाची जुनी झाडे बुंध्याला दररोज कचरा पेटवून ती कमकुवत करण्याचे प्रकार वाढले आहेत. बुंध्यात कचरा पेटविल्यामुळे जळून वडाचे झाड सोमवारी (ता.२२) कोसळले आहे. झाडांच्या बुंध्यात कचरा जाळण्याच्या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

येथील नवसह्याद्री सोसायटीच्या गेट जवळील सोमवारी (ता.२२) अशाच प्रकारे बुंध्यामध्ये जाळलेले मोठे वडाचे झाड कमकुवत झाल्याने कोसळले. हे झाड कोसळत असताना तेथून जाणाऱ्या मुली सुदैवाने वाचल्या. झाड रस्त्यातच पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. नंतर जेसीबीच्या सहाय्याने पडलेले झाड बाजूला करण्यात आले. येवढे मोठे झाड पडले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाचे कोणीही कर्मचारी साधे चौकशीला देखील या ठिकाणी आले नाही. याबद्दल नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या बुंध्याला कचरा जाळला जातो आहे. हे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच हे झाड पडले. आता परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामधील चित्रीकरणाच्या आधारे झाडांच्या बुंध्यास कचरा टाकून जाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस ठाणे व ग्रामपंचायतीला तसे पत्र पाठविले आहे.
- पी. जी. गाडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

04118

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com